Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 51 crores sanctioned for eight health centers in six talukas

सहा तालुक्यांतील आठ आरोग्य केंद्रांना ५१ कोटींचा निधी मंजूर; पालकमंत्री राम शिंदे

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 12:18 PM IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी नगर जिल्ह्यातील आठ गावांमध्ये नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

 • 51 crores sanctioned for eight health centers in six talukas

  नगर- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी नगर जिल्ह्यातील आठ गावांमध्ये नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून २०१७-१८ या वर्षासाठी एका गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांसाठी केंद्र शासनाकडून ५१ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून एका वर्षात अत्याधुनिक सुविधा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उभारणीच्या कामांना गती देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले.


  राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सोनेगाव, खर्डा, शिऊर (ता. जामखेड), मिरजगाव (ता. कर्जत), जेऊर (ता. नगर), सात्रळ (ता. राहुरी), काष्टी (ता. श्रीगोंदा), पढेगाव (ता. श्रीरामपूर) या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारती व निवासस्थानांच्या बांधकामांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच २०१७-१८ या वर्षात राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासनाकडून या आरोग्य केंद्रांच्या बांधकामांना मंजुरी व निधी मिळावा म्हणून राम शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री असताना पाठपुरावा केला होता. या आरोग्य केंद्रांना मंजुरीसह निधी मिळाला असून, त्यांच्या कामाचा आढावा शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतला.


  बैठकीसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अपर जिल्हाधिकारी बी. एस. पालवे, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक, उपअभियंता जी.बी. काळे यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील जामखेडचे पंचायत समिती सभापती मुरुमकर, कर्जतचे सभापती उत्तेकर यांच्यासह विविध तालुक्यांचे सभापती, उपसभापती, गावांचे सरपंच, गट विकास अधिकारी हेही यावेळी उपस्थित होते.


  नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना सोनेगाव (५ कोटी ८५ लाख मंजूर), खर्डा (५ कोटी ६० लाख), शिऊर (५ कोटी ८१ लाख), मिरजगाव (५ कोटी ६० लाख), जेऊर (५ कोटी ६० लाख), सात्रळ (६ कोटी ७३ लाख), काष्टी (५ कोटी ६० लाख), पढेगाव (२ कोटी १४ लाख) असा निधी मंजूर झाला आहे. यातील पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाले असून कामे सुरू झाल्यानंतर त्या प्रमाणे केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.


  पालकमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये आरोग्य केंद्रांची मागणी होती. अनेक ठिकाणी जुन्या इमारतींमुळे आरोग्य सेवेत खंड पडत होता. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी संवाद साधून या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामांना मंजुरी आणली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या केंद्राच्या उभारणीसाठी वेगाने कामे करावीत. या आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. मंजूर झालेल्या आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ज्या ठिकाणी जागा मिळाली आहे, तेथे तातडीने कामे सुरू करावीत. तसेच ज्या ठिकाणी जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे, तेथे पुढील पंधरा दिवसात ती पूर्ण करून निविदी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. एक वर्षभरात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण व्हायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Trending