आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यास ५० लाखांना गंडवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पश्चिम बंगाल येथील कंपनीच्या भंगार व्यवसायात गुंतवणूक करून दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यापाऱ्यास ५० लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील तीन जणांनी या व्यापाऱ्याशी सलगी वाढवली आणि गतवर्षी सहा महिने सलग शहरातील या व्यापाऱ्याकडून पैसे उकळले होते. वर्ष उलटून गेल्यानंतरही कामाचे कोणतेही कंत्राट मिळत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यापाऱ्याने सिडको पोलिस ठाणे गाठले. 

 

सय्यद अजमतउल्ला हुसैनी सय्यद अहेमदउल्ला हुसैनी (रा. एन-८, सिडको) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी बदरे आलम सिद्दिकी शमसुल आलम सिद्दिकी (रा. कोलकाता), राजसिंग बलदेवसिंग (रा. गोरनपूर, पश्चिम बंगाल) आणि सय्यद आतिफ (रा. कोलकाता) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सन २०१७ मध्ये सय्यद अजमत उल्ला हुसैनी यांचे मित्र अंकित घोष यांच्यामार्फत या तिघांसोबत ओळख झाली होती. ओळखीतून संवाद वाढल्यानंतर या बंगाली त्रिकुटाने हुसैनी यांना विविध व्यवसायांचे आमिष दाखवले. 

 

पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील डोमजूर इंडस्ट्रियल परिसरात बदरे आलम सिद्दिकी नामक व्यक्तीची मोठी कंपनी असल्याचे राजसिंग बलदेवसिंग आणि सय्यद आतिफ या दोघांनी हुसैनी यांना त्यातील कंपनीच्या कामाच्या भंगाराचे मोठे कंत्राट असल्याचे सांगून गुंतवणुकीसाठी आग्रह केला. राजसिंग आणि आतिफ या दोघांच्या बतावणीवर विश्वास ठेवून गतवर्षी २२ एप्रिल २०१७ ते २८ सप्टेंबर २०१७ अशा सहा महिन्यांच्या काळात हुसैनी यांनी आरटीजीएस आणि ऑनलाइन असे ५० लाख रुपये बँकेमार्फत पाठवले, मात्र परंतु १४ महिने उलटून गेल्यावरसुद्धा कुठलेच कंत्राट मिळत नसल्याचे दिसल्यावर हुसैनी यांनी राजसिंग, आतिफ आणि बदरे आलम या तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु या तिघांनीही सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनंतर संपर्कच बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हुसैनी यांनी तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...