National Breaking / मोदींचे ५७ मंत्री; ३६ जुने तर २१ नवे, मनेका गांधी, राज्यवर्धनसह ३६ मंत्र्यांना स्थान नाही

अमित शहा मंत्रिमंडळात; आणखी २३ जणांना मंत्रिपद मिळू शकते

दिव्य मराठी

May 31,2019 09:00:21 AM IST

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ५७ मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. यात २४ कॅबिनेट, ९ स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री, तर २४ राज्यमंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळात आणखी २३ जणांना मंत्रिपद मिळू शकते. मागील सरकारमधील ३६ मंत्र्यांना या वेळी स्थान मिळालेले नाही. यात अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती, मनेका गांधी, महेश शर्मा, जेपी नड्डा, राज्यवर्धनसिंह राठोड, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंह, मनोज सिन्हा, अनंतकुमार हेगडे यांचा समावेश आहे.


भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी आणि सदानंद गौडा हे मोदींनंतरचे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. सर्वाधिक ९ मंत्री उत्तर प्रदेशचे आहेत. मागील वेळी या राज्यातून १३ मंत्री होते. स्वबळावर बहुमत मिळालेल्या भाजपने आपले घटक पक्ष शिवसेना, अकाली दल, लोजप आणि रिपाइं यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले आहे. बिहारमध्ये जदयूच्या सोबतीने ४० पैकी ३९ जागा मिळवूनही जदयूला एकही मंत्रिपद नाही. जदयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, ते सरकारमध्ये राहणार नाहीत.


मोदी दिल्लीत शपथ घेत होते, आई आनंदाने टाळ्या वाजवत होत्या
मोदी यांच्या आई हिराबेन यांनी गांधीनगर येथे आपल्या घरी त्यांचा शपथविधी सोहळा पाहिला आणि आनंदाने टाळ्या वाजवल्या.

६ महिला : मागील वेळेपेक्षा एक कमी
निर्मला सीतारमण, हरसिमरतकौर बादल, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह आणि देबश्री चौधरी आहेत. मागच्या वेळी ७ महिला मंत्री होत्या. मात्र अद्याप २३ पदे रिक्त आहेत.

मुख्तार अब्बास नक्वी एकमेव मुस्लिम मंत्री. मागच्या वेळी ३ होते. हेपतुल्ला, एम.जे. अकबर आणि नक्वी. २४ राज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

ज्या ६ राज्यांत यंदा व पुढील वर्षी निवडणुका तेथील १६ जण मंत्री
यंदा ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणूक आहे. या राज्यांतून ९ मंत्री झाले आहेत. सर्वाधिक पाच मंत्री महाराष्ट्रातून आहेत.

पुढील वर्षी बिहार, दिल्ली आणि पुद्दुचेरी येथे निवडणुका आहेत. या तीन राज्यांतून ७ मंत्री झाले आहेत. यात ६ बिहारचे आहेत.

११ मंत्री राज्यसभेतून
६ कॅबिनेट मंत्री व ५ राज्यमंत्री


बंगाल- ओडिशा येथे प्रथमच भाजपचा विस्तार, तेथून फक्त ३ मंत्री
लोकसभा निवडणुकीपूर्वी प. बंगालमधून भाजपला १८ जागा मिळाल्या आहेत. तेथून २ मंत्री झाले. बाबूल सुप्रियो आणि देबश्री चौधरी. मागच्या वेळीही प. बंगालचे २ मंत्री होते.


ओडिशात भाजपला प्रथमच ८ जागा मिळाल्या आहेत. तेथून प्रतापचंद सारंगींना मंत्रिपद मिळाले आहे. मागील वेळी एक मंत्री होता.

३२७ जागा असलेल्या १३ राज्यांतून एनडीएने २९६ जागा जिंकल्या, तेथून ४६ मंत्री; प्रत्येकी ८ मंत्री यूपी व महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकातून एकूण ३२७ जागांपैकी एनडीएने २९६ जागा जिंकल्या आहेत. त्या राज्यांतून ४६ मंत्री झाले आहेत. सर्वाधिक ८ मंत्री महाराष्ट्र, उत्तर प्रदेशचे.

माजी परराष्ट्र सचिवांनाही मंत्रिपद
एस. जयशंकर आता खासदार नाहीत. २०१४ मध्ये निवृत्तीसाठी ७२ तास उरले असताना मोदी सरकारने त्यांना परराष्ट्र सचिव केले होते. निवृत्तीनंतर एक वर्षाने आता मंत्रिपद दिले आहे.

X