आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने ग्राहकाच्या मदतीने लांबवले ५८ किलो सोने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी (़डावीकडून) राजेंद्र जैन, लोकेश जैन आणि व्यवस्थापक अंकुर राणे. - Divya Marathi
आरोपी (़डावीकडून) राजेंद्र जैन, लोकेश जैन आणि व्यवस्थापक अंकुर राणे.

औरंगाबाद - वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या औरंगाबादेतील समर्थनगर शाखेतील व्यवस्थापकाने एक ग्राहक व ग्राहकाच्या भाच्यासोबत संगनमत करून तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने कंपनीत ४६६ खोटी बिले लावत २७ कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा. सन्मित्र काॅलनी, मूळ रा. दापोली, जि. रत्नागिरी), कापड विक्रेता राजेंद्र किसनलाल जैन (३९) आणि लोकेश जैन (२१, दोघेही रा. बालाजीनगर) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. वामन हरी पेठे ज्वेलर्सची समर्थनगरमध्ये नऊ वर्षांपासून शाखा आहे. कंपनीचे मालक व भागीदार मुंबई येथील विश्वनाथ प्रकाश पेठे यांनी मुख्य आरोपी राणे याची दालन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून येथे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. समर्थनगर शाखेतून होणारे सर्व व्यवहार, विक्री संगणकीकृत असून ते थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न असूनही हा प्रकार घडला.
 

असा आला सोन्याचा घोटाळा उघडकीस
डिसेंबर २०१८ मध्ये कंपनीच्या ऑडिटमध्ये पेठे यांना ५८ किलो सोन्याच्या बिलांची नोंदणी आढळली. परंतु त्याच्या बदल्यात एकही रुपया जमा झालेला आढळून आला नाही. त्यांनी यासंदर्भात राणेला विचारणा केली तेव्हा त्याने कमी भरत असलेले ५८ किलो दागिने जैन व त्याची पत्नी भारती जैन यांना दाखवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. ते दागिने पाहून लवकरच आपल्याला परत करतील, असे सांगितले. 

 

आमिषाला बळी पडल्याची चार महिन्यांनंतर कबुली

राणेने मालकाला शब्द दिला त्यानुसार एप्रिल २०१९ उजाडला तरी दागिने जमा झाले नव्हते. तेव्हा राणेने आपण टक्केवारीच्या आमिषाला बळी पडून जैन याला दागिने दिल्याचे कबूल केले. पेठे यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, सुभाष खंडागळे यांनी तपास केल्यावर जैन व राणेचा घोटाळा समोर आला. ३ जुलैला पोलिसांनी राणे, राजेंद्रसह त्याचा भाचा लोकेश जैनला अटक केली.

 

विश्वास नडला अन्... :  पेठे यांनी व्यवस्थापक राणे सांगत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला. काही दिवसांनी पुन्हा विचारणा केल्यावर राणे याने थेट पेठे व जैन यांचे बोलणे करून दिले. तेव्हा जैन याने पोलिसांत तक्रार न करण्याची विनंती करत दागिने परत करण्याचे आश्वासन दिले.

 

आरोपींना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
बुधवारी आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. आरोपींनी आणखी काही दागिने चोरले आहेत का, चोरलेले दागिने कुठे ठेवले आहेत, त्याचे काय केले, पैशाचा व्यवहार कसा केला, यात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास करण्यासाठी सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

जैन याने खरेदी केल्या महागड्या कार : आरोपी जैन याने सोने परत देण्याचे कबूल करत नंतर कारणे सांगत वेळ मारून नेली. यादरम्यान जैन याने शहरात तीन महागड्या कार खरेदी केल्या. शिवाय उच्चभ्रू वसाहतीमध्ये दोन कोटी रुपयांचे दोन फ्लॅट विकत घेत हायफाय जगणे सुरू केले होते.

 

मालकाला मेल करून दिली गुन्ह्याची कबुली
आरोपी राणे याने सहा महिने मालकाला वेगवेगळी कारणे सांगत मुदत मागितली. दरम्यान, कंपनीच्या नोंदणीमध्ये ४६६ बनावट बिले आढळली. राणे याने कंपनीचा दागिन्याला असलेला संगणकीकृत बारकोड काढून जैनला दागिने दिले होते. पितळ उघडे पडल्याचे कळताच राणे याने पेठे यांना मेल केला. मी, जैन दांपत्य व त्यांच्या भाच्याने कंपनीचे ५८ किलो सोन्याचे दागिने चोरले आहेत. मी तुम्हाला ते २० जून २०१९ पर्यंत ते परत देतो, असे त्यात नमूद केले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...