Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | 59 infant deaths in Gadchirail hospital

गडचिराेलीच्या रुग्णालयात ५९ अर्भक, बालकांचा मृत्यू; काँग्रेस नेते वडेट्टीवारांच्या भेटीत डाॅक्टरांची माहिती

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 07:33 AM IST

राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ न

 • 59 infant deaths in Gadchirail hospital

  नागपूर- राज्य सरकारने गडचिरोलीत नव्यानेच सुरू केलेल्या महिला व बाल रुग्णालयात मागील चार महिन्यात शून्य ते ५ वयोगटातील तब्बल ५९ नवजात अर्भक तसेच बालकांचा अाणि एका मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी या रुग्णालयात जाऊन माहिती घेतल्यावर उघडकीस आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते यांनी स्वत: ही माहिती दिली. या रुग्णालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५४ पदे अद्यापही रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकारही आढळून आला.


  रुग्णांच्या तपासण्यांसाठी एमआरआय, सिटी स्कॅन यंत्रे अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती मिळाली. या रुग्णालयाची शंभर खाटांची क्षमता आहे. मात्र, सध्याच्या घडीला त्यात अडीचशे महिलांना भरती करण्यात आले आहे. एका खाटेवर दोन महिलांचा समावेश असल्याचे भेटीदरम्यान वडेट्टीवार यांना दिसून आले. रुग्णालयातील बालरोग विभागाची परिस्थितीही गंभीर असून बालरुग्णांसाठी २४ खाटांचीच व्यवस्था असताना सध्या ४५ बालके भरती असल्याचे आढळून आले. रुग्णालय व परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही अनेक महिन्यांपासून थकलेले अाहेत. औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत अाहे. वडेट्टीवारांनी रुग्णांना दिले जाणारे जेवण, प्रसूती वॉर्ड, औषध कक्ष, बालरोग चिकित्सागृहाचीही पाहणी केली.


  केंंद्रीय समितीही पाहणीवर
  विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाची कॉमन रिव्ह्यू मिशन कमिटी बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. अनेक उच्चपदस्थ अधिकारी या समितीत असून, ते जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करते आहे. दरम्यान, येथील आरोग्य सेवा सुधारण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.


  मुख्यमंत्र्यांनी केले उद््घाटन
  गडचिरोली येथे पूर्वी एकच जिल्हा सामान्य रुग्णालय होते. हे रुग्णालय गडचिरोली शहरापासून लांब असल्याने शहराच्या मध्यभागी एक रुग्णालय असावे, या मागणीच्या अनुषंगाने आघाडी सरकारने २०१३-१४ मध्ये शहरात महिला व बाल रुग्णालय मंजूर केले होते. १८ कोटी ७७ लाख रुपये खर्च करून रुग्णालय बांधण्यात आले. यावर्षी १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ते मे महिन्यातच सुरू होऊ शकले. राज्यातील पहिली सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरीही येथे निर्माण करण्यात आली आहे.

Trending