आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड नदीपात्रात वाळूतस्करांवर छापा, ५९ लाखांची वाहने जप्त  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील घोड नदी पात्रात चौधरी मळा येथे पकडलेले पोकलेन मशिन व अन्य वाहने.  - Divya Marathi
श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील घोड नदी पात्रात चौधरी मळा येथे पकडलेले पोकलेन मशिन व अन्य वाहने. 

श्रीगोंदे/अहमदनगर : तालुक्यातील काष्टी येथील चौधरी मळा घोड नदी पात्रात बऱ्याच दिवसांपासून अवैध वाळू उपसा करत होते. शुक्रवारी श्रीगोंदे पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत एक पोकलेन, एक जेसीबी मशिन व एक ट्रॅक्टर असा ५९ लाख रुपयांचे वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेली वाहने सोडून देण्यासाठी एका राजकीय पुढाऱ्याने दबाव तंत्राचा वापर केला. मात्र अखेर पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता रात्री उशिरा वाहने जप्त केली.    याप्रकरणी पोकलेन चालक राजेंद्र नाथा गोयेकर (काष्टी), मालक एम. डी. शिंदे (श्रीगोंदे), जेसीबीचालक जितेंद्र जालिंदर पाचपुते (चौधरी मळा, काष्टी) व लालू रामभाऊ होले (श्रीगोंदे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राजेंद्र नाथा गोयेकर या आरोपीस अटक करण्यात आली, तर उर्वरित आरोपी फरार झाले आहेत.    श्रीगोंदे तालुक्यातील घोड व भीमा नदी पात्रात अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा केला जात आहे. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू हे नगर येथे हजर झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे व वाळू तस्करी बंद केली. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील घोड नदी पात्रात चौधरी मळा याठिकाणी एका राजकीय पुढाऱ्याचे कार्यकर्ते अनेक दिवसांपासून राजरोसपणे विनापरवाना वाळू उपसा करत होते. याबाबत काष्टी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांना याबाबतची माहिती दिल्याने २३ अॉगस्ट रोजी त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदे पोलिस यांच्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास सापळा रचून एक टू टेन पोकलेन व एक जेसीबी मशीनच्या सहायाने वाळू उपसा करताना वाळूतस्करांना पकडले. परंतु ही वाहने बड्या नेत्याच्या निगडित असल्याने तडजोड करत वाहने सोडून देण्याची त्या नेत्याने विनंती केली. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असणारा सामाजिक कार्यकर्त्याने पोलिस पथकाचे व पकडलेल्या पोकलेन व जेसीबी मशिनचे फोटो काढून थेट जिल्हा अधीक्षक ईशू सिंधू यांना पाठवले हाेते.    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व श्रीगोंदे ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्या भूमिकेमुळे जेसीबी व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात रवाना केले. परंतु पोकलेन मशिन आणण्यासाठी ट्रेलरची आवश्यकता असल्याने उशिरापर्यंत त्यांना ट्रेलर उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी तळ ठोकून होते. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, कर्मचारी दादासाहेब टाके, प्रताप देवकाते, संतोष धांडे, संजय कोतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे विजयकुमार वेठेकर, रोहित मिसाळ, फकीर शेख, बाळासाहेब मुळीक, रणजित जाधव, यांनी ही कामगिरी केली.    वाहने सोडण्यासाठी पोलिसांबर दबाव  काष्टी येथे पकडलेली वाहने एका बड्या नेत्याशी निगडित असल्याने ती वाहने सोडून देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर सुरू होता. ती वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध करत असल्याने या राजकीय नेत्यास एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला. मगच ती वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.    पोकलने आणण्यात आल्या अडचणी  पकडलेले पोकलेन आणण्यासाठी ट्रेलरची आवश्यकता असते. पोलिसांनी भाडेतत्त्वावर ट्रेलर आणला. पुढाऱ्याच्या समर्थकांनी ट्रेलर चालकास फोनवर धमकावल्याने ते ट्रेलर चालकाने नदीपात्रातून माघारी नेले. अखेर मशिन मालकाने ट्रेलरमध्ये मशिन टाकून रात्री तीन वाजता मशिन श्रीगोंदे ठाण्यात आणले, असे एका पोलिसाने सांगितले.   

बातम्या आणखी आहेत...