आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतामणी गणपती दर्शनाआधी काळाचा घाला; वाशीमच्या सहा भाविकांचा अंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- शहरापासून ५ किमी अंतरावरील वाशीम रस्त्यावर भरधाव महिंद्रा वाहन आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात वाशीम येथील ६ जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार हे आठ जण येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हिंगोली येथे येत होते. परंतु दर्शन होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या खिशात दारूच्या बाटल्या सापडल्याने त्यांचा दारूनेच घात केला की काय, अशी शंका निर्माण होत आहे. 


वाशीम शहराजवळील सुरकुंडी येथील ५ आणि वाशीम येथील ३ असे ८ जण महिंद्रा टीयूव्ही (क्रमांक एमएच ३७- व्ही २४४४) या वाहनाने हिंगोली येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत होते. मृत गणेश लक्ष्मण हजारे यांचे भाऊ संतोष हजारे यांनी सांगितले की, जीपमधील सर्व जण वाशीम येथून गुरुवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडे निघाले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास हिंगोलीजवळ कलगाव-पारोळा शिवारात अन्नपूर्णा इंग्रजी शाळेजवळ झालेल्या अपघातात सुरकुंडी येथील अनिल गजानन चव्हाण (२८) राजू विष्णू धामणे (१८), स्वप्निल राम ईगतकर (२५) तर वाशीम येथील शुक्रवार पेठेतील गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंग सोपान हजारे, सतीश नारायण मुरकुटे (२६) हे सहा जण जागीच ठार झाले. तर सुरकुंडी येथील सखाराम जिंजिबा जाधव (३५) व मदन जयाजी चव्हाण (३८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले. अपघातात मृत्यू पावलेले आणि जखमी असलेले सर्व जण मित्र असून ते १८ ते ४० वयोगटातील आहेत. 


देवदर्शनापूर्वी काळाचा घाला 
हिंगोली येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी सुमारे २ लाख भाविक येत असतात. चिंतामणी गणपती प्रत्येक मागणी पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दिवसेंदिवस चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळेच हे तरुणही भाविक म्हणून देव दर्शनासाठी निघाले होते, अशी माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस आणि मृताच्या नातेवाइकांनी दिली. परंतु देव दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने वाशीम शहरावर शोककळा पसरली आहे. 


प्रत्यक्षदर्शीअभावी अपघाताचे कारण अस्पष्ट 
हिंगोली सामान्य रुग्णालयात मृतांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृत तरुणांच्या खिशात दारूच्या बाटल्या सापडल्या असल्या तरी चालकाने मद्यप्राशन केले होते का, ही बाब तूर्तास स्पष्ट झाली नाही. या अपघाताच्या वेळी कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने तो कसा झाला ते समजू शकले नाही. अपघातातील दोघे जखमी नांदेडमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. 


अहवालातून खरे कारण कळेल 
येथील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलेल्या मृतांच्या खिशात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. परंतु ही बाब अद्याप आम्ही पंचनाम्यात घेतली नाही. वाहनांतील व्यक्तींनी मद्यपान केले होते काय, याबाबतचा अधिक तपशील मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. 
- किशोर पोटे, पोलिस उपनिरीक्षक, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे. 

 

बातम्या आणखी आहेत...