आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी शेंदताना विहिरीत पडून 6 महिला जखमी, विहिरीत होते 7 फूट पाणी; ग्रामस्थांनी वाचवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

| फुलंब्री 
फुलंब्री तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईने ग्रासले असताना अशातच फुलंब्री तालुक्यातील पानवाडी येथे विहिरीतील पाणी शेंदून काढत असताना विहिरीवरील लाकूड तुटून सहा महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान, त्याच वेळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करत गावकऱ्यांना जमा करून विहिरीत पडलेल्या सर्व महिलांना दोरीच्या मदतीने विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. 


सायमा कुर्बान शेख (१७), नजमा फय्याज शेख (३२), समीनाबी युनूस शेख (४०), सबिया युनूस शेख (१८), मुन्नाबी युसूफ शेख (५०), तमरूबी समद शेख (५०) सर्व महिला रा. पानवाडी (ता. फुलंब्री) येथील असून या महिला विहिरीत पडून मुकामार लागल्याने जखमी झाल्या आहेत.  फुलंब्री तालुक्यातील पानवाडी हे गाव डोंगरमाथ्यावर असून गावाची लोकसंख्या २०१८ आहे. मागील महिनाभरापासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने पानवाडीतील महिला गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून शेततळ्यात खोदलेल्या एका खासगी विहिरीतून पाणी शेंदून आणून आपली कुटुंबाची तहान भागवतात. दरम्यान, आज रोजच्यासारखेच गावातील महिला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास या खासगी विहिरीतून पाणी शेंदून आणण्यासाठी गेल्या होत्या. ही खासगी विहीर बांधलेली नसल्याने त्यावर लाकूड ठेवलेले होते. त्या लाकडावर पाय ठेवून महिला विहिरीतून पाणी शेंदून काढत होत्या. परंतु विहिरीवरील लाकूड सकाळी अचानक तुटून या सहा महिला ३० फूट खोल विहिरीत पडल्या. विहिरीत ७ ते १० फूट पाणी होते.  विहिरीत पडलेल्या लाकडाला पकडून महिला बाहेर काढण्याची विनवणी करू लागल्या.  दरम्यान, त्यांच्याबरोबर आलेल्या दुसऱ्या महिलांनी आरडाओरडा करत आजूबाजूच्या व गावातील नागरिकांना जमा करून विहिरीत पडलेल्या महिलांना दोरीच्या मदतीने हनिफ पटेल, मुक्तार पटेल, कदीर पटेल, गाणी पटेल यांनी बाहेर काढले. सर्व विहिरीत पडलेल्या महिलांना बाहेर काढून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर सर्व महिलांवर उपचार सुरू असून कोणत्याही महिलेस गंभीर दुखापत झालेली नाही. 


..पण काम सुरू झालेच नाही
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या पानवाडी या गावासाठी चार लाख एकतीस हजार शंभर रुपयांची नळ योजना असून विशेष दुरुस्तीतून नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर सहा खोल करणे, साठ मीटर लांबीचे चार आडवे बोअर घेणे, ३१० मीटर नवीन पाइपलाइन टाकणे, पाच एचपी विद्युत पंप बसवणे, टँकर भरण्यासाठी स्टँडपोस्ट बनवणे या कामाची मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयाने  दिली होती. परंतु २० मार्चपासून मंजुरी मिळवूनही आतापर्यंत सदर काम न झाल्याने ही घटना घडली.


लाकडावरून पडल्या अन् लाकडानेच वाचवले 
महिला विहिरीतून पाणी काढताना ज्या लाकडाचा आधार घेऊन पाणी  काढत होत्या ते लाकूड अचानक तुटले आणि आणि लाकडासह महिला विहिरीत कोसळल्या. लाकूड पाण्यावर तरंगले. मात्र सहाही महिला पाण्यात बुडू लागल्या तेव्हा या सहाही महिलांनी जिवाचा आक्रोश करत कसेबसे पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाचा साहारा घेतला.


पानवाडीला टँकरही नाही आणि विहिरीचे कामही झाले नाही
डोंगरकड्यावर असलेल्या पानवाडी गावाला सांजूळ धरणालगत विहीर खोदून पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीने तळ गाठला म्हणून गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पाणीपुरवठ्याच्या निधीमधून एक तर विहिरीचे खोलीकरण करा किंवा टँकर सुरू करा या आडमुठ्या धोरणात धड विहिरीचे कामही झाले नाही आणि पानवाडी ग्रामस्थांना टँकरचे पाणीही मिळाले नाही. म्हणून गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान शनिवारी पाणी भरताना सहा महिला २८ फुट खोल विहिरीत पडल्या होत्या. 


उद्यापासून पानवाडीला मिळणार टँकर
आज सकाळी पानवाडी येथे एकाच वेळी सहा महिला पाणी भरताना विहिरीत पडल्याची घटना घडली आणि नेहमीच कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. सहा महिला विहिरीत पडल्याने  पाणीटंचाईला लगाम बसला की काय असेच म्हणावे लागेल.  त्याचे झाले असे की, पाणी टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अनेक दिवस गुलदस्त्यात ठेवणारे जबाबदार अधिकारी-कर्मचारी आज थेट पानवाडीत टँकर घेऊन पोहोचले मात्र घाट रस्ता असल्याने वीस हजार लिटर पाणी घेऊन जाणारे टँकर घाटातच अडकून पडले. मात्र उद्यापासून सुरळीत पाण्याचे टँकर पानवाडीकरांना मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  


हरिभाऊ बागडेंकडून जखमींची विचारपूस 
पानवाडी येथे पाणी भरताना महिला विहिरीत पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमी महिलांची तब्येतीची विचारपूस केली.  या वेळी त्याच्यासोबत पंचायत समिती  सभापती सर्जेराव मेटे, जि.प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, दामुअण्णा नवपुते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, पोनि सम्राटसिंग राजपूत, उपपोलिस निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह राजकीय, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती होती.