आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारतीय नागरिक सुनील एडला यांची गोळ्या झाडून हत्या, आईच्या वाढदिवसानिमित्त घरी येण्याची करत होते तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यूजर्सीत 61 वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुनील एडला असे त्यांचे नाव होते. मूळचे तेलंगणातून असलेले सुनील एडला गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेत राहत होते. याच महिन्यात त्यांच्या आईचा 95 वा वाढदिवस होता. सोबतच ख्रिस्मस निमित्त ते सुटी घेऊन घरी येणार होते. या प्रकरणात एका 16 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. परंतु, त्याने सुनील यांची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुनील आपल्या वेंटनोर शहरातील घरात राहत होते. तसेच स्थानिक वेळेप्रमाणे गुरुवारी रात्री 8 वाजता ते नाइट शिफ्टसाठी ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी अचानक आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुनील यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या असा खुलासा झाला आहे. सुनील गेल्या 30 वर्षांपासून अॅटलांटिक काउंटीमध्ये हॉस्पिटॅलिटी बिझनेसशी संबंधित काम करत होते. 

 

आरोपीला बेड्या...
अॅटलांटिक काउंटी प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपीला शनिवारी एग हार्बर शहरातून अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत त्याने अद्याप हत्येचा खुलासा केला नाही. सोबतच पोलिसांनी त्याचे नाव जाहीर करण्यासही नकार दिला. तरीही त्याच्या विरोधात हत्या, लूट, कारजॅकिंगसह गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातही भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोतला यांचा अमेरिकेत खून करण्यात आला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...