आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- जेजुरीचा खंडोबा हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. मात्र, येथील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकावर सुविधांची वानवा होती. रेल्वे मंत्रालय व स्थानिक खासदारांच्या प्रयत्नांतून जेजुरीचे रेल्वे स्टेशन कात टाकणार आहे. येत्या ६ ते ८ महिन्यांत खंडोबाच्या भाविकांच्या स्वागतासाठी स्थानकाच्या दर्शनी बाजूला ६२ फूट लांबीचा मल्हारगड उभारला जाणार आहे. भाविकांसाठी नव्या वर्षाची ही भेट खास आकर्षण ठरणार आहे.
जेजुरीला भेट देणाऱ्या भाविकांना रेल्वेची सुविधा चांगल्या दर्जाची मिळावी, यासाठी गेले काही वर्षे सातत्याने मागणी केली जात होती. अलीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा केला. या प्रयत्नांना प्रतिसाद मिळून त्वरित निधी मंजूर झाल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर (पुणे विभाग) यांनी "दिव्य मराठी'ला दिली. तसेच जेजुरीमधील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेजुरी रेल्वे स्थानकावर भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. अनेक प्रकारची विकासकामे येथे सुरू आहेत. स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचसोबत येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी ८० मीटरपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वाधिक लांबीची २४ डब्यांची गाडीही येथे थांबविता येईल. संपूर्ण प्लॅटफॉर्मला आच्छादन घालण्यात येत आहे. तसेच प्लॅटफॉर्मची उंचीही वाढविण्यात येत आहे, असे पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर म्हणाले.
अशी असेल प्रतिकृती
खंडोबाच्या मुख्य मंदिराकडे जाणारे पहिले प्रवेशद्वार तंतोतंत उभारले जाईल. सिंथेटीन स्टोनमध्ये बनवल्या जाणाऱ्या या प्रतिकृतीची लांबी ६२ फूट, तर उंची ३३ फूट असेल तसेच मूळ गडाच्या बाजूच्या चारही कमानी उभारल्या जातील. यासाठी सुमारे ५० लाखांचा निधी मंजूर असून स्थानकातील अन्य सुविधांसाठी अडीच कोटी निधी मिळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.