जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ६४.५०% मतदान, 2014 च्या तुलनेत दीड टक्के घट

दिव्य मराठी

Apr 24,2019 10:19:00 AM IST

जालना - जालना लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ६४.५० टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाकडून ही प्राथमिक माहितीनुसार ही आकडेवारी सांगण्यात आली आहे. गत वेळच्या तुलनेत मतदानात जवळपास दीड टक्का घट झाल्याचे सांगितले जात आहे. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पैठण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६९.१६ टक्के मतदान झाले.

जालना लोकसभा मतदारसंघात १८ लाख ६५ हजार ४६ मतदारांचा समावेश असून लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यासाठी मंगळवारी मतदान प्रक्रीया पार पडली. ईव्हीएम मशीन काही वेळ बंद पडल्याचे प्रकार तीन ठिकाणी घडले. त्याशिवाय संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदानाचा टक्का कमीच हाेता. त्यामुळे दाेन तासांत जवळपास ९ टक्के मतदान झाले. मात्र ९ ते ११ या वेळेत मतदानाचे प्रमाण वाढले दुपारी ११ वाजेपर्यंत २३ टक्के मतदान झाले. तर तीन वाजेनंतर ४९.३९ टक्के मतदान झाले होते. तीन वाजेनंतर मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६४.५० टक्के मतदान झाले. यात पैठण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६९.१६ टक्के, त्यापाठोपाठ भोकरदन विधानसभा मतदारसंघात ६९.०१ टक्के तर बदनापूर विधानसभा मतदारसंघात ६७.५२ टक्के मतदान झाले. फुलंब्री ६६.३४ टक्के, सिल्लोड ६३.२६ टक्के मतदान झाले. जालना विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५२.८२ टक्के मतदान झाले.


ईव्हीएमचे बटण जाम
अंबड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा अंबड येथे सकाळी ७ ते ७.१५ वाजेच्या दरम्यान ईव्हीएम मशीनचं बटण जाम झाले होते. तेव्हा पथकाने तेथील ईव्हीएम बदलून मतदान सुरळीत केले, तर दत्ताजी भाले शाळा अंबड येथे दुपारी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण आल्यान मशीन दुरुस्त करावे लागले.


काही ठिकाणी तांत्रिक बिघाड
भोकरदन येथे सकाळी मतदान सुरू होण्याआधी मतदान केंद्रावर चाचणी मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र अन्वा पाडा येथील केंद्र क्रमांक ७२,टेंभुर्णी येथील केंद्र क्रमांक २८९, जानेफळ, मासनपूर, लिहा या पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बदनापूर तालुक्यातील काजळा मतदान केंद्र क्रमांक २१३ वरील मतदान यंत्रात सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास बिघाड झाल्याने तब्बल दोन तास मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांना ताटकळत बसावे लागले होते.

मात्र नंतर दुसऱ्या यंत्राची जोडणी करुन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मतदान यंत्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले मात्र मतदान यंत्र सुरू झाले नाही त्यामुळे दोन तास मतदारांना ताटकळत बसावे लागले ११.४५ वाजता दुसरे मतदान यंत्र बसवून प्रक्रिया सुरू करण्यात आली.

X