Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | 65 thousand devotees are in queue after the third day of Ekadashi

पंढरीत एकादशीच्या तिसऱ्या दिवशीही ६५ हजार भाविक रांगेत; ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता वारकरी दर्शन रांगेत उभे

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 15, 2019, 08:37 AM IST

विठ्ठल मंदिरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतराची रांग

  • 65 thousand devotees are in queue after the third day of Ekadashi
    रविवारी भाविकांची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचलेली हाेती.

    पंढरपूर - आषाढी एकादशी सोहळ्याच्या दोन दिवसांनंतरही पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांची गर्दी संपता संपलेली नाही. त्रयोदशीच्या दिवशी रविवारीदेखील सुमारे ६० ते ६५ हजार वारकरी पदस्पर्श रांगेत प्रतीक्षेत हाेते. यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे १४ लाख भाविक आल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशीच्या दिवशी तर विठ्ठल मंदिरापासून पुढे तब्बल ६ ते ७ किलोमीटर अंतर दूरपर्यंत दर्शनाची रांग पोहाेचलेली होती. दशमी आणि एकादशी या दोन दिवसांत सुमारे २ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

    सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेले लाखो भाविक आजही पंढरीत वास्तव्य करीत आहेत. रविवारी पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत पाेहाेचली हाेती. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता वारकरी दर्शन रांगेत उभे दिसत आहेत.


    जुने पावती पुस्तक वापरून एका कर्मचाऱ्याकडून फसवणूक : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सेवासुविधा पुरवण्यावर भर दिलेला आहे. भाविकांची फसवणूक होऊ नये यासाठी मंदिर समितीने देणगी पुस्तकांची वेगळ्या पद्धतीने छपाई करून खबरदारी घेतलेली आहे. तरीदेखील मंदिर समितीच्या एका कर्मचाऱ्याने अष्टमीच्या दिवशी जुने पावती पुस्तक वापरून काही भाविकांकडून देणगी उकळल्याच्या तक्रारी समाेर अाल्या. त्यावरून संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर समितीचे जुने पावती पुस्तक कर्मचाऱ्याकडे कसे आले, त्याने किती भाविकांची फसवणूक केली याच्या चाैकशीचे काम मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाद आणि मुख्य लेखापाल कदम करीत आहेत.

Trending