Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 658 crore loan waiver of 2 lakh 18 thousand 395 farmers in district

जिल्ह्यातील २ लाख १८ हजार ३९५ शेतकऱ्यांना ६५८ कोटींची कर्जमाफी

बंडू पवार | Update - Aug 06, 2018, 12:35 PM IST

सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेला नगर जिल्हा कर्जमाफीतही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील २ लाख १८ हजार ३९५ शेत

 • 658 crore loan waiver of 2 lakh 18 thousand 395 farmers in district

  नगर- सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेला नगर जिल्हा कर्जमाफीतही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील २ लाख १८ हजार ३९५ शेतकऱ्यांना आतापर्यंत तब्बल ६५८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे.


  नगर जिल्ह्याने कर्जमाफीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या वर्षी १ जूनला नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नांवर शेतकरी संपाला सुरूवात झाली होती. या संपाचे लोण त्यानंतर संपूर्ण राज्यभर पसरले. राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेऊन आंदोलने केली. सात दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे नगरसह राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर ८ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करुन कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर २८ जूनला मुख्यमंत्र्यांनी दीड लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेच्या तीन दिवसांनंतर कर्जमाफीबाबत राज्याच्या सहकार विभागाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा शासननिर्णय काढला. या कर्जमाफीच्या शासननिर्णयातही अनेक निकष लावण्यात आल्यामुळे प्रारंभी मोठा गोंधळ उडाला. त्यात ऑनलाइनच्या प्रक्रियेमुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी सुरळीत सुरु झाली.


  सहकार क्षेत्रात कायम अग्रेसर राहिलेला नगर जिल्हा कर्जमाफीच्या अमंलबजावणीतही पुढे आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. सरकारच्या विविध निकषाप्रमाणे जिल्ह्यातील २ लाख ७३ हजार १६९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २ लाख १८ हजार ३९५ शेतकऱ्यांना ६५८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीची सर्वाधिक ७०० कोटींची रक्कम जळगावला मिळाली, तर त्याखालोखाल नगर जिल्ह्याला ६५८ कोटींची रक्कम मिळाली. राज्यात कर्जमाफीत नगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.


  शासन निकषाप्रमाणे कर्जमाफी
  जिल्हा सहकारी बँकेने शेतकरी कर्जमाफीची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी केली आहे. पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे कर्जमाफ करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ६५८ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे. अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया सुरुच आहे.
  - रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक.

Trending