Flood / नुकसानीचे पंचनामे सुरू : सांगलीत 66 हजार हेक्टर शेतीला फटका, सव्वा लाख शेतकरी बाधित

महापुराने नुकसान झालेल्या सांगली व काेल्हापूर जिल्ह्यातील घरांचे पंचनामे सुरू झाले असून शनिवारपर्यंत याद्या निश्चित होतील.

दिव्य मराठी

Aug 17,2019 09:18:00 AM IST

सांगली - महापुराने नुकसान झालेल्या सांगली व काेल्हापूर जिल्ह्यातील घरांचे पंचनामे सुरू झाले असून शनिवारपर्यंत याद्या निश्चित होतील. पूरग्रस्तांना शहरी भागात १५ हजार, तर ग्रामीण भागात १० हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येत असून त्यामधील ५ हजार रुपये रोखीने वाटप सुरू आहे. सांगलीत आतापर्यंत १४ हजार ४२५ पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे ७ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप झाले आहे. यंत्रणांनी अनावश्यक कागदपत्रे न मागता पूरबाधितांना मदत पोहोचवावी, असे सक्त निर्देश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.


सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ४३३ घरे पूर्णत:, तर २,९९७ घरे अंशत: पडली आहेत. तसेच ९९ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्यात पुरामुळे अंदाजे ६६ हजार ९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १ लाख १९ हजार ७२४ शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांमध्ये मुख्यत: ऊस, सोयाबीन, हळद यांचा समावेश आहे.


चार तालुक्यांतील १०४ गावे व महापालिका क्षेत्रामधून ३ लाख ५ हजार ९५७ व्यक्ती पुरामुळे स्थलांतरित झाल्या. या आपत्तीत २६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १ व्यक्ती बेपत्ता आहे. जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील २०१ जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर अशी ६४ जनावरे, घोडा, उंट व बैल अशी ३ जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर अशी ७८ जनावरे आणि २१ हजार १९ कोंबड्या व इतर पक्षी यांचे नुकसान झाले आहे. पशुधनाचे अंदाजे ७३ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगलीत सुमारे १०० एटीएम पाण्याखाली होती. ती तत्काळ सुरू करून सर्वत्र पुरेशी रक्कम उपलब्ध करण्याचे बँकांना निर्देश दिल्याचे डॉ. चौधरी म्हणाले.


२५ बंधारे पाण्याखालीच
काेल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर, भोगावती नदीवरील २५ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ६ खुला आहे. यामधून २८२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर कोयना धरणामधून २५५३४ क्युसेक विसर्ग करण्यात आला, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम. शिंदे यांनी दिली.


स्वच्छतेसाठी २.८० काेटी
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१० पूरग्रस्त गावातील वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाकडून २ कोटी ८९ लाखांचा निधी मिळाला आहे, अशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली. एक हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना ५० हजार, तर १००० पेक्षा जास्त लाेकसंख्या असलेल्या गावांना १ लाख रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून प्राप्त झाला आहे. ताे निधी ३१० पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाईल.


कोयनेचे सर्व दरवाजे बंद
मुसळधार पावसामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होऊ लागल्याने ३ आॅगस्ट राेजी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले हाेते. मात्र आता पाणलाेट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे शुक्रवारी १३ दिवसांनी हे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे कराड, पाटण तालुक्यासह सांगली, काेल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.


४८ पथकांनी केला वीजपुरवठा सुरळीत
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या पुणे, बारामती परिमंडळातून ४८ पथके कोल्हापुरात, तर १२ पथके सांगली जिल्ह्यात तैनात आहेत. या पथकांनी सांगली जिल्ह्यातील १३ उपकेंद्रे, २ हजार ५२७ रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून एकूण १ लाख २७ हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्रे, ३ हजार २८८ रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून १ लाख ७० हजार १३३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.


बँकिंग सेवा पूर्ववत, अनेक मार्ग खुले
सांगली जिल्ह्यातील ३२९ एटीएमपैकी २२९ एटीएम मशीन दुरुस्त करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६४७ पैकी ३९० एटीएम मशीन दुरुस्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३७ रस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ बंद रस्त्यांपैकी ६५ रस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले आहेत. तसेच बंद झालेल्या ४५ मार्गापैकी ३९ मार्गावरील एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

X