Earthquake / इंडोनेशियात 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप: समुद्राच्या 220 किमी खोल भूकंपाचा केंद्र

जपानमध्ये देखील 5.5 तीव्रतेच्या भूकंपाचे झटके, जीवितहानी नाही

दिव्य मराठी वेब

Jun 24,2019 11:18:10 AM IST

जकार्ता - इंडोनेशियाच्या किनारपट्टीलगत सोमवारी मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.2 एवढी नोंदवली गेली. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील किनारपट्टीपासून काही अंतरावर इंडोनेशियाच्या डार्विन परिसरात भूकंपाचे झटके तब्बल 2 मिनिटे जाणवले गेले. भूकंपाचे केंद्र समुद्रात 220 किमी खोल होते. या दरम्यान अनेक नागरिकांनी आप-आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भूकंपाचे अनुभव मांडले. या भूकंपात अनेक इमारतींना तडे गेले तरीही अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही.


त्सुनामीचा धोका नाही
इंडोनेशियाच्या स्थानिक वेळेनुसार, सोमवारी सकाळी शाळा आणि महाविद्यालये सुरू असताना भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. यानंतर वेळीच सर्वच कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावर आले. तब्बल दोन मिनिटे नागरिकांना भूकंपाचे हादरे जावणले आहेत. यात अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले. तर काही घरांचा काहीसा भाग देखील कोसळला. परंतु, कुठल्याही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. समुद्रात भूकंपाचे केंद्र असले तरीही हवामान विभागाने त्सुनामीचा धोका नाही असे स्पष्ट केले आहे. तज्ञांच्या मते, भूकंपाचा केंद्र समुद्राच्या 220 किमी खोल असल्याने त्सुनामी उसळली नाही. सोबतच, जमीनीवर सुद्धा भूकंपाची तीव्रता कमी होती.

जपानमध्येही भूकंपाचे झटके
इंडोनेशियात भूकंप होत असताना सोमवारीच जपानमध्ये सुद्धा भूकंपाचे हादरे बसले आहेत. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.5 एवढी होती. तसेच भूकंपाचा केंद्र छिबा येथे जमीनीच्या 60 किमी आत होता. जपानमध्ये भूकंपानंतर कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सोबतच, त्सुनामीची देखील शक्यता वर्तवण्यात आली नाही.

X
COMMENT