आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वाइन फ्लू'मुळे शहरात 7 रुग्णांचा मृत्यू, सप्टेंबरमध्येच पाच बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक महापालिका हद्दीत सप्टेंबर २०१८ मध्ये एकूण ८३ स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आढळले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ पर्यंत एकूण १०२ स्वाइन फ्लूबाधित रुग्ण असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला अाहे. महापालिका हद्दीबाहेरील १५ रुग्णांचा नाशिक येथील रुग्णालयात मृत्यू झाला अाहे.

 

डेंग्यूच्या रुग्णांची मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीची अाकडेवारी कमी असल्याचा दावा पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी केला अाहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यातच स्वाइन फ्लूमुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला अाहे. दरम्यान, सातपूर परिसरात स्वाइन फ्लूसदृश आजाराने दुसरा बळी घेतला आहे.

 

२०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यात ४८ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते व त्यात ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण २२७ स्वाइन फ्लूसदृश रुग्ण होते व त्यामध्ये २९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी नाशिक पूर्व विभागात स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक अाढळत अाहे, अशी माहिती अायुक्तांनी दिली. सन २०१८ मध्ये सप्टेंबर महिन्यात एकूण १२६ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले असून जानेवारीपासून एकूण ४९४ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले आहेत. सन २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यात १०५ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले होते. जानेवारीपासून एकूण २३७ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असून सातपूर, सिडको व पंचवटी विभागात डेंग्यूचे रुग्ण अधिक अाढळले अाहेत. या वर्षी डेंग्यूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला.


पालिका रुग्णालयात औषधोपचाराची सुविधा आहे. परंतु स्वाईन फ्ल्यू संसर्ग होऊ नये म्हणुन नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थंडी वाजून ताप येणे, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास हाणे, नाकातून पाणी गळणे इ. लक्षणे आढळताच त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य औषधोपचार सुरू करावा. हस्तांदोलन करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा. सर्वसामान्य नागरिकांनी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, फळाचा रस घ्यावा. तसेच भरपूर पाणी प्यावे. डेंग्यू रोगाचा प्रसार एडीस नावाच्या स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या डासांपासून होतो. विशेषत: घरात व घर परिसरात विविध ठिकाणी साठविलेले वापरावयाचे स्वच्छ पाणी किंवा घराचे छत, गॅलरी, झाडाच्या कुंडया, कुलर, टायर्स इत्यादी ठिकाणी जमा झालेला पावसाच्या स्वच्छ पाण्यात होते. घरात विशेषत: फ्रिजमागील ट्रेमध्ये जमा झालेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. ऑगस्ट २०१८ मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत एकुण ७९४५८ घरांना भेट देऊन तपासणी केली असता १३२२ घरात डेंग्यू डासांच्या अळया आढळल्या. या अळ्यांमधून डेंग्यू डासांची वाढ होऊन त्या घरातील व परिसरातील नागरिकांना हे डास चावल्यामुळे डेंग्यू रोगाचा प्रसार होतो.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...