निवृत्त तहसीलदाराचा १२ वी नापास मुलगा चालवत होता बनावट प्राप्तिकर विभाग, स्पेशल-२६ चित्रपटाप्रमाणे ७० लोकांची लूट

दिव्य मराठी

Apr 24,2019 09:50:00 AM IST

इंदूर - स्पेशल-२६ चित्रपटाप्रमाणे तोतया अधिकाऱ्यांचे पथक तयार करून प्राप्तिकर विभागाला समांतर त्याच नावे शोध शाखा चालवणारी एक टोळी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे पकडली आहे. निवृत्त तहसीलदाराचा १२ वी नापास मुलगा ही शाखा चालवत होता. चार साथीदारांसह तो हे सर्व चालवत होता. या टोळीने एका खोलीत कार्यालय थाटून भरतीही केली होती. भरती करण्यात आलेल्या युवकांकडून त्यांनी येथील बड्या व्यापाऱ्यांच्या फाइल्सही चाैकशीसाठी तयार केल्या होत्या. या तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी नोकरीच्या नावाखाली जवळपास ७० युवकांकडून ४० लाख रुपयांची लूट केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून आयडी, शिक्के, नियुक्ती पत्र, आदेश पत्र, रजिस्टर, लॅपटाॅप, प्रिंटर, मोबाइल, प्राप्तिकर विभागाच्या फलक लावलेले वाहन, एअरगन, पोशाख, बॅज आणि भारत सरकारचे चिन्ह असलेले बेल्ट जप्त केले आहेत. आरोपी युवकांना प्राप्तिकराच्या छाप्याबाबत विशेष प्रशिक्षण देत असत.


या संदर्भात पोलिसांत तक्रार देणाऱ्या शुभम साहू यांनी सांगितले की, मी नोकरीच्या शोधात होतो, त्या वेळी पवन नावाच्या मित्राने या टोळीचा प्रमुख देवेंद्र डाबरची अोळख करून दिली. देवेंद्रने तो इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन विभागाचा प्रमुख इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असल्याचे सांगितले. शुभमच्या मते, आरोपीच्या घरी आणि कार्यालयात जवळपास २५ मुले कामाला होती. रुजू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर प्रतिमहा १२ हजार रुपये पगार देऊ, असे देवेंद्रने सांगितले होते, मात्र तो अद्याप मिळालेला नाही. शुभमने नोकरीत कायम करण्याची विनंती देवेंद्रला केली असता, त्याने सर्वांकडून प्रत्येकी ५० हजारांची मागणी केली. त्यानंतर मी व पवनने २५ हजार रुपये कार्यालयात जमा केले. नंतर शुभमला कळाले की या टोळीने ७० मुलांकडून नोकरीत कायम करण्याच्या नावावर लाखो रुपयांची लूट केली आहे.


आरोपींनी विधानसभा निवडणूक ड्यूटीचे बनावट आदेशही जारी केले होते
मागील वर्षी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पिथमपूर मतदारसंघात २० मुलांना निवडणूक ड्यूटीचे आदेश जारी केले होते. देवेंद्र प्राप्तिकर अधिकाऱ्यांप्रमाणे वागायचा आणि पांढऱ्या रंगाच्या सफारीत फिरायचा. आपल्या सफारीवर त्याने भारत सरकार आणि मोनोही लावला होता. आपल्यासोबत तो गनमॅन, ड्रायव्हर आणि इतरांना युनिफाॅर्ममध्ये बसवायचा.

X