Home | Maharashtra | Pune | 700 years old Inscription found in Talegaon

सातशे वर्षांपूर्वीचा यादवांचा शिलालेख तळेगावी सापडला; १२ व्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 06:49 AM IST

पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरे येथे सातशे पाच वर्षे जुना शिलालेख सापडला आहे. यादव राजघराण्यातील रामदेवराय यादव यांचा हा शिल

 • 700 years old Inscription found in Talegaon

  पुणे- पुण्याजवळच्या तळेगाव ढमढेरे येथे सातशे पाच वर्षे जुना शिलालेख सापडला आहे. यादव राजघराण्यातील रामदेवराय यादव यांचा हा शिलालेख असल्याची माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि डॉ. पद्माकर गोरे यांनी दिली. या शिलालेखामुळे बाराव्या - तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या आणि विशेषत: यादवांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले.


  तळेगाव ढमढेरेचा परिसर अनेक जुन्या गढ्या, मंदिरे, वाडे यांनी युक्त आहे. येथील एका जुन्या गढीच्या खोदकामात हा शिलालेख गवसला आहे. याच परिसरात ७० वर्षांपूर्वी राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याचा इ. स.७६८ मधील म्हणजेचइ. स. १२५० वर्षांपूर्वीचा ताम्रपट सापडला होता. त्यातून पुण्याविषयी खूप जुनी आणि वेगळी माहिती उजेडात आली होती. प्रस्तुत शिलालेखही त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे बलकवडे म्हणाले.


  १३१३ पर्यंत यादवांचीच सत्ता
  शिलालेखाचा काळ शके १२३५ प्रभादीनाम संवत्सरे म्हणजेच इ. स. १३१३ असा आहे. लेखात रामदेवराय यादवाचा 'प्रताप चक्रवर्ती रामचंद्रदेव' असा उल्लेख आहे. रामचंद्र यादवांचा महामंडलेश्वर म्हणजे स्थानिक प्रांत अधिकारी सामळ सदू तसेच स्थानिक पारनेर संघाचा कारभारी गोदाजी नाईकाचा उल्लेख आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर रक्षणासाठी लोकाज्ञा स्वरूपात हा शिलालेख कोरलेला आहे. इतिहासातील नोंदींवरून यादवांचा पराभव १२९४ मध्ये झाला असला तरी १३१३ पर्यंत पुणे व परिसरात यादवांचीच सत्ता होती, हे स्पष्ट होते. तसेच शासन व्यवस्थेतील अधिकारांची उतरंड व नावेही समजतात. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासासाठी नवे पुरावे, संदर्भ उपलब्ध झाले आहेत, असे मत इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी मांडले.


  शिलालेख असा आहे
  > उंची ७ फूट एक इंच, रुंदी २० इंच
  > जाडी १६ इंच, वरच्या भागात मध्यभागी शिवलिंग कोरले आहे
  > डावीकडे सूर्य, उजवीकडे चंद्र कोरला आहे
  > घासून सपाट केलेल्या बाजूवर १२ ओळींचा मजकूर
  > देवनागरी लिपीत अक्षरे कोरली, लेखाची भाषा संस्कृतप्रचुर प्राकृत मराठी आहे

Trending