आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहात्तरवर्षीय आजी सायकलवरून करणार पुणे ते काश्मीर एकवीसशे किमी प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्चना जोशी 

औरंगाबाद - आमचं आता वय झालंय... आम्ही या वयात काही करू शकतो असे वाटत नाही... असे म्हणत निराश असणारे वयोवृद्ध आपल्याला दिसतात, पण या आयुष्याच्या संध्याकाळी वयाच्या ७२ व्या वर्षीदेखील एक जिद्द मनात ठेवून कार्य करणारे थोडकेच असतात. त्यातीलच एक म्हणजे पुणे येथील निरुपमा भावे. पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोड येथे राहणाऱ्या भावे आजी दररोज शहरातील सायकल ट्रॅकवर तीन तास सायकलिंग करतात. त्यांच्याद्वारे प्रेरणा घेऊन आज या परिसरातील अनेक वयोवृद्धांनी सायकलिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे सकाळी या परिसरात बहुतांश आजी-आजोबाच सायकलिंग करताना दिसले तर नवल वाटायला नको. 

अशी मिळाली प्रेरणा
सायकलिंगची प्रेरणा कशी आणि कधी मिळाली, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘आमचे एक ६२ वर्षांचे जवळचे मित्र आहेत, ते औंधपासून वाडिया कॉलेजपर्यंत सायकलवर जाणे-येणे करायचे. ते आमच्या घरीदेखील सायकलवरच यायचे. त्यांचे सायकलवर येण्याचे मला खूप आकर्षण वाटायचे. त्यांनी केलेले वर्णन ऐकून मीच सायकलच्या प्रेमात पडले. ही प्रेरणा घेऊन मी पुतणीची सायकल २ किमी चालवली. हळूहळू आत्मविश्वास वाढला आणि दररोज सायकलिंगला सुरुवात केली. असा माझा सायकल प्रवास सुरू झाला.

पहिला मोठा सायकल प्रवास
वयाच्या सत्तरीमध्येही अत्यंत सुदृढ आणि उत्साही असणाऱ्या निरुपमा भावे यांनी २० वर्षांपूर्वी सायकल चालवायला सुरुवात केली. त्यांनी वाघा बॉर्डर ते अमृतसर या सायकल सफरीत पहिल्यांदा सहभाग घेतला. आजींनी आजपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात ते सौराष्ट्र, गाेवा ते कोचीन, भुवनेश्वर ते कोलकाता, लेह-लडाख, वाघा बॉर्डर ते आग्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सायकलद्वारे प्रवास केला आहे.  भावे आजी आता पुणे ते जम्मू-काश्मीरचा प्रवास २१ डिसेंबरला सुरू करणार आहेत. त्या पुण्यातून रवाना होणार आहेत. २१५० किमीचा हा प्रवास ६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण होईल. 
 

प्रवासात कोणताही वाईट अनुभव नाही...
सायकल प्रवास करताना त्यांना आजपर्यंत कोणताही वाईट अनुभव आला नाही, उलट लोकांनी त्यांचे स्वागतच केले. कोणी उत्सुकतेने माझ्याकडे पाहतात, तर कुणी माझ्यासोबत सेल्फी काढतात. अडचण आल्यास लोक मदतही करतात, असे त्यांनी सांगितले.
 

सायकलिंगमुळेच आजारातून उठले
माझ्या फिटनेसचे रहस्यच सायकल चालवणे हे आहे. मला कोणताही आजार नाही. परंतु चार-पाच वर्षांपूर्वी व्हायरल इन्फेक्शनमुळे माझ्या मेंदूला सूज आली होती. १० दिवस आयसीयूत होते, काहीच करू शकत नव्हते. व्हीलचेअरवर बसून असायचे, पण काही दिवसांत हळूहळू घरात फिरू लागले. त्यानंतर एक दिवस घराजवळच काही अंतर सायकल चालवली. मी हे सर्व करत होते म्हणून मी आजारपणातून लवकरच उठले
- निरुपमा भावे