आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

७३ वर्षीय विदेशी वृद्धाची १९ वर्षांपासून महाराष्ट्रात समाजसेवा, शेतकऱ्यांना विहीर खाेदून देण्यापासून ते शाळांत वाॅटर कूलर बसवण्यासाठी करतात आर्थिक मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • १९ वर्षांपासून हा पाहुणा न चुकता अजिंठ्याला येतो आणि यथोचित मदत करून पुन्हा मायदेशी परततो
  • हॉलंडचे रहिवासी असलेल्या जाेओ यांची कर्मभूमी आता महाराष्ट्रच झाली आहे

शरद दामोदर 

फर्दापूर - भारत भेटीवर आलेल्या एका ७३ वर्षीय विदेशी पाहुण्याला महाराष्ट्रातील संस्कृतीचा असा लळा लागला की ताे दरवर्षीच भारत भेटीवर येऊ लागला. अजिंठा लेणीसह तो या परिसरातील लोकांच्या प्रेमातही पडला. येथील लोकांचे दु:ख आपलेच मानून त्यांच्या मदतीलाही धावून येऊ लागला. १९ वर्षांपासून हा पाहुणा न चुकता अजिंठ्याला येतो आणि यथोचित मदत करून पुन्हा मायदेशी परततो. एखाद्या शाळेला वस्तू भेट देणे असो की गरीब कुटुंबाला आर्थिक मदत देणे असो, हा पाहुणा अशी मदत करणार हे ठरलेलेच. त्यामुळे गावकरीही त्यांची आतुरतेने वाट पाहतात. या पाहुण्याचे नाव आहे जोओ ईमेन. हॉलंडचे रहिवासी असलेल्या जाेओ यांची कर्मभूमी आता महाराष्ट्रच झाली आहे. 

जोओ ईमेन हे परिवारासह पंचवीस वर्षांपासून भारत भ्रमणासाठी येतात. ते हाॅलंडमध्ये तीस वर्षे शासकीय नाेकरीत होते.   तीस वर्षांपूर्वी ते श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते. नेगाेंबो येथे त्यांना तीन परिवार असे भेटले की त्यांची परिस्थिती हलाखीची हाेती.  या कुटुंबांना त्यांनी अनेक वर्षे आर्थिक मदत केली. श्रीलंकेत लिट्टे आणि सरकारमधील संघर्षामुळे त्यांनी तेथे जाणे बंद केले. १९९५ पासून ते भारतात येऊ लागले. प्रथम ते गोव्यात गेले. कलंगुट  येथील इलशिदा नावाच्या विधवेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिला सहा वर्षे दरमहा आर्थिक मदत केली. तेथीलच आठ अपंग मुलांनाही त्यांनी सहा वर्षे दरमहा आर्थिक मदत केली. पण गोव्यातील पर्यटकांच्या गर्दीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी गोव्याला जाणे बंद केले.  गत १९ वर्षांपासून ते महाराष्ट्रात मदतीचे काम करू लागले. अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले असता फर्दापूर येथे मुक्कामाला थांबले. त्यांनी सहकुटुंब फर्दापूर तांडा शाळेला भेट दिली.  शाळेत मुलांना पिण्याचे पाणी नव्हते म्हणून त्यांनी विंधन विहीर खोदून मोटार बसून दिली. शाळा खोलीला रंगरंगोटी, मुलांना शालेय साहित्य व खेळणी भेट दिली. वाडीकिल्ला (ता. सोयगाव) येथील जि.प.शाळेच्या खोलीला रंगरंगोटीसह सुशोभीकरण करून दिले.  फर्दापूर शाळेत मुलांना खेळणी व साहित्य घेऊन दिले. फर्दापूर गावातील कमलबाई राजपूत यांना डोळ्यांचे ऑपरेशन करून लेन्स बसवून दिले. शिवाय एका वर्षाचे राशनही भरून दिले.  मुसा तडवी यांच्या डोळ्यांचे उपचार करून नवीन चष्मा घेऊन दिला. फर्दापुरात  अनेकांना ते दरवर्षी कपडे भेट देतात.

घटोत्कच लेणी पाहण्यासाठी गेले असता या मार्गातील जंजाळ (ता. सिल्लोड) गावात पिण्याच्या पाण्यासाठी तीन वेळेस बोर खाेदले. पण पाणी लागले नाही.  ठाणा ता. सोयगाव येथील जि.प. शाळेला संगणक, खेळणी आणि वर्गखोलीसाठी ५० बेंच दिले.  येथीलच अलिया माजिद शेख या ८ वर्षीय मुलीच्या डोळ्यांचे जालना येथे नेऊन ऑपरेशन केले. भोकरदन येथील अपंगांच्या शाळेला म्युझिक सिस्टम, किचन शेड, वाॅटर मशीन, वॉशिंग मशीन व खाण्याचे साहित्य खरेदी करून दिले. सिल्लोड येथील जोगेश्वरी अपंग शाळेला गॅस, किचनचे  साहित्य, टीव्ही व शाळेला रंगरंगोटी करून सोलर वाॅटर हिटर आणि वॉटर कुलर घेऊन दिले.

सिल्लोड येथील भराडी रोडवरील मतिमंद मुलांच्या वसतिगृहात ब्लँकेट व वाॅटर फिल्टर व एक मोठे म्युझिक सिस्टिम व किचनचे साहित्य दिले. दोन मोठे सोलर सेट व खेळणीही दिल्या. मांडना ता.सिल्लोड येथील मतिमंद मुलांच्या शाळेला किचन सेट, गॅस कनेक्शन, एक वर्षाचा किराणा व टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीन दिले.  टिटवी गावाला भेट देऊन तेथे एक किलोमीटरवरील वहिरीवर मोटार बसवून गावापर्यंत पाइपलाइन टाकून दिली.  तेथील शाळेतील मुलांना दप्तरही घेऊन दिले. पिंपळवाडी येथील शाळा खोलीवर नवीन पत्रे बसवून रंगरंगोटी करून दिली. जुने साहित्य विक्रीचा व्यवसाय :


गरजूंना मदत करणारे जोओ ईमेन हे सेवानिवृत्त आहेत. तेथील आठवडी बाजारात ते जुन्या साहित्याची विक्री करतात.  दुकानात आलेल्या ग्राहकांना ते गरजूंना मदत करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्याकडून मिळालेली मदत घेऊन महाराष्ट्रातील गरजवंतांना मदत करतात. या कामात त्यांची पत्नी जोझी याही मदत करतात. त्या आजारी असल्याने मागील दोन वर्षांपासून त्या महाराष्ट्र भेटीला येत नाहीत. पण, त्यांची मुलगी जाेलिता वडिलांसोबत येते.

दुसऱ्याची मदत करणे हाच धर्म

माणसाने एक-दुसऱ्याला मदत करणे हेच खरे कार्य आणि धर्म आहे. मी जिवंत असेपर्यंत गरिबांना मदत करत राहील.
- जोओ ईमेन, पर्यटक, हॉलंड

वडिलांचा वारसा जपणार


मी हाँलंडमध्ये ब्युटी पार्लर चालवते. वडिलांच्या कार्याला मदत करणे मला आवडते. माझ्याकडे आलेल्या महिलांना मी गरिबांना मदत करण्याचे आवाहन करते व मिळालेली मदत आम्ही इकडे येऊन खर्च करतो. वडिलांचे हे काम मी त्यांच्यानंतरही करत राहणार. 
- जोलिता, पर्यटक.

 बातम्या आणखी आहेत...