आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर शहरातील तहसील ते शाहू चौक या एकाच रस्त्यावर पडले ७३६५ खड्डे !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहरातील सर्वच प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची शब्दश चाळण झाली आहे. याची दखल घेत ‘मी लातूरकर’ या सामाजिक कार्यकर्त्यांच्या समूहाकडून शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालय ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची मोजदाद करण्यात आली. त्या खड्ड्यांभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ काढण्यात आले. या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोजलेल्या खड्ड्यांची संख्या ७ हजार ३६५ एवढी भरली आहे. बाकीचे खड्डे न मोजण्यापलीकडे गेले आहेत.

लातूर शहरात नांदेड नाका ते बार्शी रस्त्यावरील शासकीय महिला तंत्रनिकेत आणि नवीन रेणापूर नाका ते औसा रस्त्यावरील छत्रपती चौक हा प्रमुख रस्ता आहे. उर्वरीत अंतर्गत रस्ते आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रमुख आणि सर्वच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातच गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने मनपाने रस्त्यावर केलेली मुरूम आणि डांबराची मलमपट्टी उखडून गेली आहे. सहजपणे वाहन चालवता येईल असा अर्धा किमीचा रस्ताही उरला नसल्याची स्थिती आहे. प्रारंभी मनपाने खड्डा पडला की त्यात मुरूम भरण्याची पद्धत सुरू केली होती. मात्र आठच दिवसात तिथला मुरूम निघून जाणे आणि खड्डा पूर्ववत होण्याचे प्रकार घडत होते. तरीही महापालिकेची डांबरी रस्त्याला मुरुमाची मलमपट्टी सुरूच होती. काही नागरीक आणि संघटनांनी याला आक्षेप घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून डांबरी आणि खडीच्या मिक्श्चरने खड्डे बुजवले जात आहेत. मात्र त्याची गती अत्यंत संथ आहे.खड्डे मोजून केले बुजवण्याचे आवाहन
 
दरम्यान, मी लातूरकर या सजग युवकांच्या समूहाने शनिवार आणि रविवारी शहरातील खड्डे मोजत त्याभोवती पांढऱ्या रंगाचे वर्तुळ काढण्याचा संकल्प या समूहाने केला होता. परंतू तहसिल कार्यालय ते छत्रपती शाहू महाराज चौक या रस्त्यावरचे खड्डे मोजण्यातच त्यांचे दोन दिवस  गेले. उर्वरित खड्डे पुन्हा मोजले जाणार आहेत. या रस्त्यावर तब्बल ७ हजार ३६५ खड्डे आढळले असून तरुणांनी त्याभोवती पांढरे वर्तुळ काढले आहेत. आम्ही खड्डे मोजून त्याची ओळख निश्चित केली आहे. आता मनपाने तातडीने त्यात डांबराचे मिक्सश्चर भरावे, अशी मागणी मी लातूरकर या तरुणांच्या समूहाच्या वतीने उमेश कांबळे यांनी केली आहे. तर महापौर सुरेश पवार यांनी सांगितले की शहरातील खड्डे पूर्वी मुरुमाने भरले जात होते. परंतु माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून आता ते डांबराच्या मिक्श्चरने भरले जाणार आहेत. येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होईल, असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...