आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ७५० बसगाड्यांना ब्रेक; एसटीचे ८० लाखांचे उत्पन्न बुडाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवली. जिल्ह्यातील सुमारे ७५० बसगाड्यांना ब्रेक लागल्याने महामंडळाचे सुमारे ७० ते ८० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, शहरातील तीनही बसस्थानकांत शुकशुकाट होता. 


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने नागरिकांनी प्रवास करून बाहेरगावी जाण्याचे टाळले. शहरात आंदोलन शांततेत झाले असले, तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी किरकोळ घटना घडल्या. ठिकठिकाणी महामार्ग अडवून ठिय्या मांडण्यात आला होता. महामंडळाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील विविध अकरा आगारांत ७५० बसगाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. शहरातील माळीवाडा बसस्थानकातही शुकशुकाट असल्याने बसस्थानक स्वच्छ धुवून काढण्यात आले. एसटीबरोबरच खासगी प्रवासी वाहतुकीवरही बंदचा परिणाम दिसून आला. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असताना गुरुवारी राज्य परिवहनची प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. जिल्हाभरात दररोज धावणाऱ्या सुमारे साडेसातशे बसगाड्या विविध आगारात दिवसभर उभ्या करण्यात आल्या. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून दररोज ७० ते ८० लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, बससेवा बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, चालक व वाहकाचा एक दिवसाचा पगार कपात होण्याची भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. याप्रकरणी महामंडळ कोणती भूमिका घेणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले. 


पोलिसांशी संपर्क साधून निर्णय 
जिल्ह्यात सुमारे ७५० बसगाड्या असून दररोज ७० ते ८० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवसभर बससेवा बंद असल्याने बसगाड्या उभ्या आहेत. सुमारे अडीच हजार चालक-वाहक असून त्यांच्या पगार कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गाड्या सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर. 

बातम्या आणखी आहेत...