आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- २५ वर्षांपूर्वी अपघातामुळे कमरेतून अधू झाल्याने चालणे-फिरणे मुश्कील झाले, मात्र त्याचा बाऊ न करता निवृत्तीनंतर एका ७९ वर्षीय आजींनी परिसरातील लहान मुले, महिलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना हरिपाठ वाचून दाखवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विमल मुकुंदराव क्षीरसागर असे या आजींचे नाव असून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ज्ञानदानाचे आपले कार्य या वयातही तेवढ्याच उत्साहाने सुरू ठेवले आहे.
थोड्याशा त्रासाने आयुष्यात काही राम नाही, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला विमल मुकुंदराव क्षीरसागर या प्रेरणादायक आहेत. हडकोतील एन-१२ येथे राहणाऱ्या विमल आजींना परिसरात आेळखत नाही, असे शोधूनही सापडणार नाहीत. पती-पत्नी दोघेही शिक्षक होते. २५ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले, तर अपघातात विमल आजींना अपंगत्व आले. तेव्हापासून वॉकरच्या साहाय्याने त्या चालतात. घरात दोन मुले आणि सुनांसोबत त्या राहतात.
टाकाऊतून टिकाऊ : क्षीरसागर आजी चॉकलेटचे रॅपर, उदबत्तीचे रिकामे पुडे, पावडरचे डबे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, औषधाचे खोके यांचा वापर करून सजावटीच्या वस्तू तयार करू लागल्या. त्यांच्या कल्पकतेने परिसरातील महिलांना त्याचे आकर्षण वाटू लागले. त्या आजीबाईंकडे येऊन यातील क्लृप्त्या जाणून घेऊ लागल्या. त्यांना मार्गदर्शन करण्यात आजीबाईंचा वेळही सत्कारणी लागत आहे. हे करतानाच आजी आता परिसरातील मुले आणि ज्येष्ठांसाठी हरिपाठाचे आयोजन करतात. स्वत: हरिपाठ गाऊन दाखवत त्याचा अर्थ सांगतात. दररोज १५ ते २० जण त्यांच्या घरात हरिपाठासाठी जमतात. यातून वेळ चांगला जातो आणि नवनिर्मितीचा आनंदही मिळतो. कचऱ्यात जाणाऱ्या वस्तूंपासून नवीन काही केल्याचे समाधान मिळते.
पोथ्या वाचून काढल्या, गीतेच्या पानांचे लिखाण
चालता-फिरता येत नसल्याने घरातील कामे करणे त्यांना शक्य होत नाही. यामुळे सुरुवातीला जप, पूजापाठामध्ये स्वत:ला व्यग्र ठेवले. पोथ्या वाचून काढल्या. मग गीतेचा अर्थ समजून घेत त्याची पानेच्या पाने लिहू लागल्या. याने वह्या भरल्या. पण सतत बसून पाठीचा आणि डोळ्यांचा त्रास सुरू झाला. मग आजींनी कल्पकतेचा वापर करत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यास सुरुवात केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.