आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक : गुजरातच्या ‘आदर्श’ सोसायटीत ठेवीदारांचे ८०० कोटी अडकले; गैरव्यवहारप्रकरणी संचालक अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गुजरातमधील आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या महाराष्ट्रात तब्बल ६० शाखा असून यात सुमारे ८०० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. सोसायटीचे संचालक मंडळ आणि त्यांच्या नातेवाइकांनी बोगस कंपन्या स्थापन करून त्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज दिले. बोगस कंपन्यांना कर्ज दिल्याच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) सोसायटीचे अध्यक्ष मुकेश मोदी यांच्यासह सर्व संचालक मंडळावर गुन्हे नोंदवून सहा महिन्यांपूर्वीच अटक केली आहे. याचा परिणाम म्हणजे सर्व शाखांच्या कार्यालयांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार थकले. पगार नसल्याने कर्मचारी सोसायटी सोडून गेले, भाडे मिळाले नाही म्हणून बहुतांश ठिकाणच्या इमारत मालकांनी कार्यालयाला टाळे ठोकले. ठेवीदार शाखांकडे चकरा मारतात, परंतु सोसायटीला लागलेले टाळे पाहून निराशेने परतत आहेत. 


१९९९ मध्ये राजस्थानमध्ये आदर्श सोसायटीची पहिली शाखा स्थापन झाली. सुरुवातीला भागधारकांच्या पैशांमधून कर्जवितरण सुरू झाले. पुढे चालून या सोसायटीने ठेवी जमा करायला सुरुवात केली. ठेवी जमा करणे, कर्जवाटप करणे, ठेवींवरील व्याजाचा परतावा वेळेत देणे आदी कारणांमुळे या सोसायटीवर लोकांचा विश्वास बसू लागला. राजस्थानमध्ये शाखांची संख्या वाढल्यानंतर या सोसायटीने २०११ मध्ये महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली. आजपर्यंत राज्यात तब्बल ६० शाखा स्थापन करून जवळपास ८०० कोटी रुपयांच्या ठेवी या सोसायटीने एकट्या महाराष्ट्रातून जमा केल्या आहेत. कुणी मुलीच्या लग्नासाठी, कुणी निवृत्तीनंतर येणाऱ्या आजारपणासाठी तर कुणी घर घेण्यासाठी म्हणून आपल्या आयुष्याची पुंजी या सोसायटीत ठेवली. मात्र, आपला पैसा घेऊन ही सोसायटी पोबारा करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण झाले तेच.
 

एकाच शॉपमध्ये ३३ कंपन्या आणि त्यांना कर्ज
हरियानामधील सुशांत शॉपिंग आर्केड या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एकाच गाळ्यामध्ये तब्बल ३३ कंपन्या कागदावर दाखवलेल्या होत्या. या कंपन्या सोसायटीचे अध्यक्ष मुकेश मोदी आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावाने रजिस्टर्ड आहेत. या ३३ आणि इतर मिळून १८७ बोगस कंपन्यांना आदर्श सोसायटीच्या माध्यमातून तब्बल १२ हजार ४१४ कोटी रुपयांचे कर्ज दिले. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अध्यक्ष मुकेश मोदीसह इतर संचालकांना अटक केलेली आहे.
 

 

शाखांना टाळे, पैसे कुणाला मागायचे; ठेवीदारांपुढे प्रश्न
राज्यातील बहुतांश शाखांना इमारत मालकांनीच भाडे थकवल्यामुळे टाळे लावले आहे. शिवाय जिथे शाखा सुरू आहेत, तेथे कुठलाही व्यवहार हाेत नाही. ज्या ठेवीदारांकडे शाखा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक आहेत, ते सतत संपर्क करतात. तेव्हा त्यांना सांगण्यात येते, की लवकरच संचालक मंडळ निर्दोष सुटेल, जेवढ्या ठेवी अडकलेल्या आहेत, त्यापेक्षा अधिक रकमेची मालमत्ता संचालक मंडळाकडे आहे. त्यामुळे तुमचे पैसे मिळतील, धीर धरा.

 

औरंगाबादमध्ये तक्रार दाखल, शाखेला तीन महिन्यांपासून टाळे 
औरंगाबादमधील गुलमंडी शाखेमध्ये दोन लाख रुपयांची एफडी करणाऱ्या एका ठेवीदाराने पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. मला आता पैशांची गरज आहे, पण शाखेला तीन महिन्यांपासून कुलूप असून माझी फसवणूक झाली, असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात सोसायटीचे स्टेट हेड  एम. बी. कदम, झोनल मॅनेजर नीलेश नारंगीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघांचेही मोबाइल स्वीच ऑफ आहेत.

बातम्या आणखी आहेत...