८५ वर्षीय तरुणाने सुमारे ५४ वर्षांपूर्वीच बनवला नदीजोड प्रकल्पाचा आराखडा

दिव्य मराठी

Apr 22,2019 10:19:00 AM IST

औरंगाबाद - पाटबंधारे विभागात तब्बल ४० वर्षे नोकरी करणारे औरंगाबादचे मधुकर पोळ हे नदीजोड प्रकल्पाचे ब्रेन आहेत. त्यांनी ५० वर्षांपूर्वी नदीजोड प्रकल्पाचा आराखडा दहा वर्षांच्या अथक परिश्रमाने तयार केला. तो सरकारला सुपूर्दही केला. आजवरच्या सर्वच प्रधानमंत्र्यांनी तो पाहिला. सर्वांना तो आवडलाही, मात्र तो पूर्णत्वाकडे जाऊ शकला नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी हे संशोधन कागदावरच राहिले आहे. पोळ यांचे वय आता ८४ आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले तर हा जन्म व संशोधन सार्थकी लागेल असे ते अभिमानाने सांगतात. पोळ यांनी आपले सर्व आयुष्य नदीजोड प्रकल्पाच्या संशोधनालाच वाहिले आहे. ते स्वत: सिव्हिल इंजिनिअर असून पाटबंधारे खात्यातून अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले.

२७ रजिस्टरमध्ये आहे आराखडा
दररोज पहाटे तीनला उठायची सवय.भारतात वारंवार दुष्काळ अन् पाणीटंचाई पाहून एकदा सहज देशाच्या नकाशाचा अभ्यास केला. इंजिनिअरिंग ड्रॉइंग सुरू झाले. भारतातल्या सर्व नद्या एकत्र जोडता येतील का हा ध्यास घेतला. किती नद्या आहेत, किती मोठा भूभाग लागेल, किती खर्च येईल, किती माणसे प्रकल्पासाठी लागतील यावर संशोधन सुरू झाले. एक तंत्रज्ञ जागेवर बसून काय काम करू शकतो त्यांची ताकद पोळ यांनी सरकारला त्या काळात दाखवून दिली. तब्बल तेवीस हजार पाने त्यांनी लिहिली. त्यात फक्त अणि फक्त नकाशे व इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, जे की फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केलाच तर तंत्रज्ञालाच कळू शकते. एकूण २७ रजिस्टरमध्ये हा आराखडा तयार झालाय. तो तन, मन व धनाने सांभाळण्यात व त्यावर सतत चिंतन करण्यात पोळ कुटुंबीयांचे आयुष्य गेलेय.

इंदिरा गांधी ते वाजपेयींपर्यंतचा प्रवास

पोळ यांनी हा आराखडा १९६० मध्येच पूर्ण तयार केला. अनेकांशी चर्चा केल्यावर खरोखरीच हा देशातला सर्वोत्तम आराखडा असल्याची खात्री झाल्यावर १९६७ मध्ये त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन तो दाखवला. इंदिरा गांधी यांनी या आराखड्याची खूप प्रशंसा केली. त्या वेळी खर्च अपेक्षित होता ८४ हजार कोटी रुपये. एवढा खर्च झेपणारा नसल्याने हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवण्याची योजना आखण्याची तयारीही झाली. पण त्याला मूर्त स्वरूप आले नाही. त्यांनतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई व अगदी अलीकडे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी प्रकल्पाची ब्ल्यू पिंट पाहिली. त्यांनीही खूप कौतुक केले, पण दोघांचेही सरकार जास्त काळ न टिकल्याने याला चालना मिळाली नाही, असे पोळ यांचे म्हणणे आहे.

प्रकल्प १० वर्षांत शक्य
मधुकर पोळ यांना मी ओळखतो. त्यांचे संशोधन चांगले आहे. पण त्याचा समावेश राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात नाही. तो प्रकल्पच निराळा आहे. आम्ही बराच अभ्यास करून जो आराखडा तयार केला आहे त्याची माहिती संकेतस्थळावर आहे. हा प्रकल्प नेमका कधी होईल हे सांगणे अवघड आहे. पण मनावर घेतल्यास तो दहा वर्षांत पूर्ण होऊ शकतो.
- सुरेश प्रभू , केंद्रीय मंत्री

सरकारकडून आशा :

प्रथम मी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटलो होतो. तेव्हा मला शाबासकी दिली होती व तुम्हाला या बदल्यात काय पाहिजे, असे विचारले होते. तेव्हा माझे एकचे उत्तर होते -मी माझ्या देशाची सेवा केली आहे. हा प्रकल्प सुरू झालेला पाहायचा आहे. त्यानंतर ५० वर्षे निघून गेली. तेव्हा तंत्रज्ञान फारसे विकसित नसल्याने मी ८० वर्षांचा कालावाधी सांगितला होता व ८४ हजार कोटी खर्च होता. आता फार तर १ किंवा सव्वा लाख कोटी होईल, पण प्रकल्प फक्त दहा वर्षांत पूर्ण होऊ शकतो.
मधुकर पोळ, संशोधक

या प्रकल्पासाठी आयुष्य वेचले : माझे वयही आता ८१ आहे.पाटबंधारे खात्यात जबाबदार पदावर असूनही त्यांनी हे मोठे काम केले त्याचा खूप अभिमान वाटतो.जायकवाडी प्रकल्पाचे डिझाइनही त्यांनीच केले. १७ बदल्या झाल्या. हुशार असून प्रमोशनही खूप उशिरा मिळाले. त्याची खंत न बाळगता माझे यजमान दररोज पहाटे ३ ला उठून हे काम करीत. रात्री घरी आल्यावर परत उत्तर रात्री जागून त्यांनी २३ हजार पानी हस्तलिखित ड्राफ्ट केलाय. तो जपताना त्यांची पूर्ण पेन्शन खर्च झाली.
सुहासिनी पोळ (मधुकर पोळ यांच्या पत्नी)

X