आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानितीश गोवंडे
पणजी - प्रसिद्ध युरोपियन दिग्दर्शक गोरान पास्कलजेविक यांच्या ‘डिस्पाइट द फॉग’ या इटालियन चित्रपटाने ५० व्या इफ्फीला (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला) सुरुवात होणार आहे. पणजी येथे या महोत्सवाला २० नोव्हेंबर रोजी सुरुवात होत आहे. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान जगभरातील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळेल.
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध प्रकारांमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. ‘ऑस्कर रिट्रोस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र दालन याठिकाणी असून याद्वारे मिशेल कर्टिज यांचा ‘कॅसाब्लांका’, व्हिक्टर फ्लेमिंग, बेन हर यांचा ‘गॉन विथ द विंड’, विल्यम वायलर यांचा ‘द बेस्ट इअर्स ऑफ अवर लाइव्हज्’, जोसेफ एल. मॅनकीविक्झ यांचा ‘ऑल अबाऊट इव्ह’, डेव्हिड लीन यांचा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, रॉबर्ट वाइज यांचा ‘द साउंड ऑफ म्युझिक’, फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांचा ‘गॉडफादर’, जोनाथन डेम यांचा ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ आणि रॉबर्ट जेमेकिस यांचा ‘फॉरेस्ट गम्प’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.या सर्व चित्रपटांना ऑस्कर स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या विभागात नॉमिनेशन मिळालेले आहे. तसेच, पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले तर बहुतेक चित्रपट हे हॉलिवूड क्लासिक मानले जातात. असे दुर्मिळ पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची संधी यंदाच्या ५० व्या इफ्फीमध्ये रसिकांना मिळणार आहे.
इफ्फीच्या निमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेने मिनी मूव्ही मेनिया नावाने लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा गोवा राज्य आणि देश अशा दोन पातळ्यांवर आयोजित करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी विषय दिला जाणार असून ७२ तासांत लघुपट तयार करून तो सादर करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सिनेप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.