आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात चोरांचा सुकाळ: 55 पोलिसांची पेट्रोलिंग, तरी 16 दिवसांत 9 चोऱ्या 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जिल्ह्यात चोऱ्या व दरोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना त्या प्रमाणात तपासाचे प्रमाण कमी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले अनेक गु्न्ह्यांतील आरोपी पोलिसांना ताब्यात घेता येत नाहीत. त्यामुळे तपासात हलगर्जी करणाऱ्या १८ अधिकारी व ५९ कर्मचाऱ्यांना एसपींनी कारणे दाखवा नोटिसाही काढल्या. तर काहींचा अहवाल आयजींकडेही पाठवला. तरीही पोलिसांचा ढिसाळपणा 'जैसे थे'च आहे. एकीकडे सहा वेळा कोम्बिंग ऑपरेशन, ५५ पोलिसांची पेट्रोलिंग, चार चेक पोस्ट असूनही नवीन वर्षातील सोळा दिवसांत नऊ ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या झाल्या आहेत. 

 

अवैध दारू विक्री, वाळू चोरी या प्रकरणांवर पोलिस प्रशासनाने चांगली कामे केली आहेत. जालना शहरासह तालुक्याच्या विविध गावांमधील दारू अड्डे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे नागरिकांतून पोलिसांचे कौतुक होत असतानाच चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना रोखण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याच्या प्रतिक्रियाही नागरिकांतून उमटत आहेत. पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्यांचा आढावा घेऊन कामात हलगर्जी करणाऱ्या १८ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह ५९ कर्मचाऱ्यांना २७ डिसेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसांमुळे चोऱ्या, घरफोड्या रोखल्या जातील अथवा घडलेल्या गुन्ह्यांचा तपास सतर्कतेने होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नोटिसांनंतरही कुठलाच बदल जाणवत नसल्याचे गेल्या पंधरा दिवसांतील कारवायांतून दिसून येत आहे. अगोदरच गत वर्षात पाच हजारांच्या जवळपास गुन्हे घडले आहेत. यात विशेष करून अवैध धंद्यांचा समावेश आहे. चोऱ्या, घरफोड्या आदी घटना मोठ्या प्रमाणात घडत असतानाही पोलिस निरीक्षकांसह स.पो.नि, हेड कॉन्स्टेबल, बीट अंमलदार, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे एसपींच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नोटिसा काढल्या. तर १० अधिकाऱ्यांचा अहवाल आयजी मुत्याल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

 

तीन जिल्ह्यांच्या पोलिसांची कारवाई :

अंबड, घनसावंगी तालुक्यातील वडीगोद्री, शहागड, सुखापुरी परिसरात महिनाभरापूर्वीच बीड, औरंगाबाद, जालना पाेलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात काही जणांना ताब्यातही घेतले. जालना शहरातही १४ जानेवारीला ही माेहीम राबवण्यात आली आहे. 

 

एसपीच्या पथकांनीच मारल्या धाडी : 
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पो.नि. यशवंत जाधव यांची पथके थेट कारवाया करीत आहेत. अंबड, शहागड, सुखापुरी, वडीगोद्री या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तरीही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. 

 

शेतवस्तीवरील कुटुंब जाताहेत गावांत : 
चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे विशेष करून अंबड, घनसावंगी तालुक्यातील सुखापुरी, वडीगोद्री या परिसरातील काही शेत वस्त्यांवरील कुटुंबीय गावात येऊन राहू लागले आहेत. 

 

पंधरा दिवसांतील चोरी व घरफोडीच्या ठळक घटना 
२ जानेवारी : जालना शहरातील वृंदावन कॉलनीतील महिलेचे १ लाख २६ हजाराचे दागिने लंपास. 
३ जानेवारी : जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे शिवारात कापूस वेचणाऱ्या महिलेचे दहा हजारांचे दागिने पळवले. 
८ जानेवारी घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती गावात तीन घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला. 
९ जानेवारी जालना : व्यंकटेशनगर भागात रात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी सिगारेटच्या गोदामाचे शटर तोडून २४ लाखांच्या सिगारेट पळवल्या. 
१२ जानेवारी भोकरदन : तालुक्यातील देहेड येथे चंडिका मंदिरात दानपेटी फोडून ९१ हजारांचा ऐवज लंपास केला. 
१३ जानेवारी अंबड : शहरातील महालक्ष्मी ट्रेडर्स फोडून ३५ हजारांचे सिगारेट लंपास, तालुक्यातील वसंतनगर, ईश्वरनगर येथे घरफोड्या करुन सोन्या, चांदीचे दागिने असा १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला. अंकुशनगर या गावांमध्येही दुकानांसह चार घरे फोडली. 

 

एलसीबी, एडीएसचा तपास 
स्थानिक गुन्हे शाखा, एडीएसची पथके जाऊन काही गुन्हेगारांना ताब्यात घेत आहेत. परंतु, स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे पोलिस अधीक्षकांनी नोटिसा दिल्या आहेत. 

 

तपास सुरूच 
चोऱ्यांचा तपास सुरू आहे. पेट्रोलिंगही वाढवली आहे. चोऱ्या, घरफोड्या होणार नाहीत यावर पोलिसांकडून कारवाया सुरुच आहेत. एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.

 

बातम्या आणखी आहेत...