आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरजातीय विवाहित ९७ टक्के महिलांना ‘संस्कृती’चा जाच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रोशनी शिंपी 

औरंगाबाद - महात्मा गांधी आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना प्राेत्साहन दिले. अलीकडे या विवाहांचे प्रमाण वाढलेही आहे. मात्र असे विवाह केलेल्या महिला सुखी, आनंदी असतीलच असा दावा करणे धाडसाचे ठरू शकते. रूढी, परंपरा, सण, सोवळे तसेच जडणघडणीच्या प्रचंड तफावतींचा जाच असा विवाह केलेल्या ९७ टक्के महिलांना सहन करावा लागतो, असा निष्कर्ष प्रा.आरती धानवे यांनी संशोधनानंतर काढला आहे. अशा ५५ टक्के महिलांना विवाहानंतर माहेरच्या मंडळींकडूनही अत्याचार सहन करावे लागत असल्याचे प्रा. धानवे यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात प्रा. आरती धानवे यांनी पीएचडीसाठी प्रबंध सादर केला आहे. ‘महाराष्ट्रातील आंतरजातीय व आंतरधर्मीय झालेल्या विवाहांमध्ये होणाऱ्या कौटुंबिक अत्याचार प्रकरणांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला. प्रा. डॉ. स्मिता अवचार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि पुणे विभागात त्यांनी हे संशोधन केले. विवाहित महिलांची जडणघडण, सांस्कृतिक परंपरा, रूढी यांच्यातील तफावत व त्यातील गैरसमजातून अत्याचाराचा सामना करावा लागतो, असे ७३ टक्के महिलांनी  प्रा. धानवे यांच्याकडे मान्य केले. समाजात होणाऱ्या कोणत्याही बदलात महिला केंद्रस्थानी असतात. कसाही विवाह असो, रूढी, परंपरा, सणावळींचे सोवळे पाळण्याची जबाबदारी महिलांवर असते. मुलांवर संस्कार करुन पुढच्या पिढीला वारसा हस्तांतरित करण्याचेही काम त्यांच्यावर सोपवले जाते. अशा वेळी महिलांची मानसिक कोंडी होते. पूर्वाश्रमीचे काही अन् नव्या जाती किंवा धर्मातील काही अशा सर्वांची सरमिसळ करुन जीवन जगताना मानसिक-भावनिक गोंधळही होतो, असे प्रा. धानवे यांनी आपल्या प्रबंधात नमूद केले आहे. असे सुचवले आहेत उपाय

  • आंतरजातीय आणि धर्मीय विवाहितांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे
  • बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी निधी उपलब्ध व्हावा.
  • नोकरी, शिक्षण आणि शिष्यवृत्तीचे आरक्षण मिळावे
  • अशा जोडप्यातील महिलांना प्रसूती रजा इतरांच्या तुलनेत अधिक द्यावी.
  • नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर नोंदणी कार्यालयाने अचानक भेट देऊन विवाहितेची स्थिती योग्य आहे अथवा नाही याची चौकशी करावी.

अल्प उत्पन्न गटातील कुटुंबात अधिक समस्या

आंतरजातीय आणि धर्मीय विवाहांत अल्प उत्पन्न गटात या समस्या अधिक आहेत. यासोबत आर्थिक कुचंबणा ही सर्वात मोठी समस्या आहे. माहेर, सासरहून आर्थिक मदत मिळत नाही. अशा वेळी सामान्य आयुष्य जगणे कठीण होते. अगदीच नोकरी करायची तर मुलांची आबाळ होते. कारण आई अथवा सासू मूल सांभाळण्यासाठी नसते, असेही या संशोधनातून समोर आले आहे.