आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाचे 90 टक्के नुकसान; तरी हिंगोली जिल्ह्यात पैसेवारी 70.58

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संपूर्ण मराठवाड्यातील पीक नुकसानीचा अाढावा घेऊन मराठवाड्यातील ९० टक्के खरिपाची पिके हातून गेली, अशी स्पष्टाेक्ती नुकतीच दिली अाहे. मात्र हिंगाेली जिल्हा प्रशासनाकडून अजूनही उंटावरून शेळ्या हाकलणे सुरू अाहे. हिंगाेली जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाल्यानंतरही प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी ७०.५८ पैसे जाहीर केली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार अाहे.


हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करण्यात अाली हाेती. यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर चाळीस हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली आहे. मूग, उडीद, तूर, ज्वारी पिकांचे क्षेत्र प्रत्येकी दहा ते वीस हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी ७० टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने मूग व उडदाचे पीक केव्हाच हातून गेले. ऑक्टोबरच्या पंधरवाड्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरु केली असतानाच २० ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुळधाण उडवली. कापलेले सोयाबीन पावसामुळे भिजून त्याला काेंब फुटले तर कापूस, तूर, ज्वारी पिके उभी भिजली. त्यानंतरही जिल्ह्याची पैसेवारी ७०.५८ पैसे जाहीर करून महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चाेळले. महसूल विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी ७०७ गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर केली अाहे. हिंगोली तालुक्याची पैसेवारी ७५.१३ पैसे, सेनगाव ७६.९१ पैसे, कळमनुरी ७२.६१ पैसे, वसमत ६४ पैसे तर औंढानागनाथ तालुक्याची पैसेवारी ६४.२५ पैसे जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने काढलेले पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्यामुळे शेतकरी पीक विमा व इतर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने पीक कापणी प्रयोग करून पैसेवारी जाहीर केली असा आरोप शेतकरी करत अाहेत.


हिंगोली जिल्ह्यात २० ऑक्टोबर रोजी १५ मिलीमिटर, ता. २३ ऑक्टोबर रोजी १.७३ मिलीमिटर, २५ ऑक्टोबर रोजी १५.९३ मिलीमिटर, २६ ऑक्टोबर रोजी १७.७१ मिलीमिटर, २७ ऑक्टोबर रोजी १८.६१ मिलीमीटर तर २८ ऑक्टोबर रोजी सरासरी २४.४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पीक नुकसान झाले नाही काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये
जिल्ह्यात पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारी जाहीर करताना प्रशासनाने काळजी घेण्याबाबत बुधवारी (ता.६) जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. -गजानन घुगे, माजी अामदार
 

बातम्या आणखी आहेत...