नागपूर / मंत्र्यांकडे येणारे ९० टक्के अर्ज नोकरी मागणीचे, मात्र सर्वांना रोजगार अशक्य; ऊर्जामंत्री बावनकुळेंची कबुली

सर्वांनाच नोकऱ्या देता येत नाहीत. त्यामुळे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत - ऊर्जामंत्री

दिव्य मराठी

Jul 16,2019 08:52:00 AM IST

नागपूर - नोकऱ्या नाहीत. हाताला काम नाही. बेरोजगारीची समस्या अत्यंत चिंताजनक पातळीवर येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्य लोकांकडून मंत्र्यांना येणारे अर्ज व त्यावरील विषय पाहिल्यास ९० टक्के अर्ज केवळ नोकऱ्या वा हाताला काम मागणारे आढळून येतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणारे अर्ज नेमके कसे हाताळायचे, असा प्रश्न पडतो, अशी धक्कादायक कबुली खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधताना दिली.


नागपूरचे पालकमंत्री असलेल्या बावनकुळे यांनी रविवारी नागपुरातील रवी भवनाच्या सभागृहात लोकांचे अर्ज स्वीकारण्याचा उपक्रम आयोजित केला होता. पालकमंत्र्यांना अर्ज देणाऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. त्यात सर्वाधिक प्रमाण होते तिशीतील तरुणांचे. प्रत्येक जण मंत्र्यांना अर्ज सोपवताना नोकरी मिळावी यासाठी आर्जव करताना दिसत होता. येणारे अर्ज तपासून त्यावर आवश्यक त्या सूचना मंत्र्यांकडून अर्जावर लिहिल्या जात होत्या. सूचना दिलेले अर्ज स्वीय सहायकांकडे सोपवले जात होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या अर्जांचे स्वरूप तरी काय असते, असा प्रश्न कुणालाही पडावा. यातील ९० टक्के अर्ज एक तर नोकऱ्या मागणारे वा हाताला काहीतरी काम मागणारे आहेत. अतिशय बिकट परिस्थिती आहे, अशी कबुलीच बावनकुळे यांनी दिली. पर्यावरण रक्षणासह लोकांना काम मिळावे यासाठी महिलांचे गट तयार करून त्यांच्याकडे बांबूंची लागवड करण्याची जबाबदारी सोपवण्याचा उपक्रम नागपूर जिल्ह्यात सुरू केला आहे. असे अनेक उपक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मोठ्या प्रमाणात येणारे अर्ज हाताळायचेे तरी कसे?
एवढ्या मोठ्या संख्येने येणारे अर्ज हाताळायचे तरी कसे, अशी व्यथा मांडताना बावनकुळे म्हणाले, सर्वांनाच नोकऱ्या देता येत नाहीत. त्यामुळे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. कौशल्य विकासाच्या उपक्रमांवर आमचा भर आहे. एखाद्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केल्यावर तरुणांनी त्याआधारे स्वतःचा उपक्रम सुरू करावा यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

X