आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील पावसामुळे जलाशयात ८९ टक्के पाणीसाठा; जायकवाडीतून मराठवाड्यातील शेतीसाठी ६ पाणी पाळ्या मिळणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - जायकवाडी धरणातील ८९ टक्के पाणी साठ्यातून पुढील वर्षभरासाठी सहा पाणी पाळ्या मिळणार असून दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना   मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याही धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व काही प्रमाणात शेतीसाठी पाणी सोडले जात असून पिकाला जीवदान मिळत आहे. यंदा अद्यापही मराठवाड्यात दमदार पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.  नाशिकमध्ये झालेल्या पावसाने जायकवाडी धरण ९२ टक्क्यांवर आले होते. यातूनच हे पाणी सोडले जात आहे. याच पाण्यावर सहा पाणी पाळी मिळतील, अशी माहिती अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. 

मागील वर्षी जायकवाडीत कमी पाणी साठा असताना खरीप व रब्बी हंगामाच्या नावाखाली जास्त पाणी सोडल्याने धरण मृत साठ्यात आले होते. या पाण्याचे योग्य नियोजन झाले तर मराठवाड्यात वर्षभर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. मात्र पाणी असले की नको तेव्हा पाणी सोडण्यात आल्याने तालुक्याला दुष्काळाचा मोठा फटका बसला होता. आता या पाण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. मराठवाड्यावर मागील वर्ष वगळता सलग चार वर्षे सतत दुष्काळ राहिल्याने जायकवाडीचा पाणीसाठा दर उन्हाळ्यात मृत साठ्यात येत राहिला. 
 
बंधारे भरत आले 
जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटपैकी ७ गेटमधून धरणावरील ८ बंधाऱ्यात पाणी सोडले जात आहे. हे बंधारे भरत आल्याची माहिती सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली.
 
जायकवाडी धरणातून खरीप व  रब्बी हंगामासाठी सहा पाणी पाळी सोडल्या जातील, असे नियोजन होईल. कालवा समितीच्या बैठकीत तो निर्णय होईल. सध्या तरी पाणी पिण्यासाठी सोडले असल्याने मराठवाड्यातील दुष्काळात हा दिलासा आहे. पाणी जपून वापरा, शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पाणी द्यावे. 
- अशोक चव्हाण, अभियंता, पाटबंधारे विभाग पैठण

जायकवाडीत पाणी मुबलक  असून शेतीचा  व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यात धरणावरील मोटारीला वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे करण्यात यावा. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा जास्त फायदा होईल, असे नियोजन केले जावे. वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे  सुरू करावा. 
- सचिन घायाळ, चेअरमन, एकनाथ-घायाळ शुगर लि. पैठण.
 
ओलिताखाली क्षेत्र (हेक्टरमध्ये)
औरंगाबाद :   ९०५३
जालना :    ३६५८०
परभणी :    ९७४४०
अहमदनगर :    २२००
बीड :   ३७९७९
एकूण :   १८३३२२

बातम्या आणखी आहेत...