आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचा तडाखा; मराठवाड्यातील 909 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तीन वर्षांपूर्वीच दुष्काळाच्या कराल जबड्यातून कशीबशी सुटका करून घेणारे मराठवाड्यातील शेतकरी यंदाही भीषण जलसंकटाचा सामना करत आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे धीर सुटल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. गत वर्षभरात ९०९ शेतकऱ्यांनी फास लावून घेतला आहे. दुष्काळाचा तडाखा आणि कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचे शल्य यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढतेय, असे मत वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. सिंचनाचे मोठे क्षेत्र असून हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबादेत आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे, हे विशेष. 

 

शासकीय योजना राबवूनही मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सन २०१४ मध्ये ५७४ तर २०१५ मध्ये ११३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१६ मध्ये चांगला पाऊस होऊनही १०५३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली होती. २०१७ मध्ये ९९१ तर या वर्षी २३ डिसेंबरअखेर ९०९ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. 

 

दुष्काळाचा सर्वाधिक फटका 
मराठवाड्यात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कर्जमाफीच्या घोषणा झाल्या तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे आहे. उत्पादनात ८० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्यामुळे उत्पादन खर्चही निघालेला नाही. त्यातच आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यासमोर जगावे कसे, हाच प्रश्न आहे. - कैलास तवार, अध्यक्ष, मराठवाडा शेतकरी संघटना 
 
शेतकऱ्यांना पेन्शन द्या 
कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. खरिपात बँकांच्या माध्यमातून पतपुरवठा झाला नाही. हमीभावाचे सरकारचे आश्वासन थोतांड ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी द्यायला हवी. प्रत्येक शेतकऱ्याला ५ हजार रुपये पेन्शन सुरू करण्याची गरज आहे. तेलंगणासारखे प्रतिहंगाम दहा हजार नगदी अनुदान दिले तर काही प्रमाणात दिलासा मिळेल . - किशोर तिवारी, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन 
 
बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या 
बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक १९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गतवर्षी ही संख्या २०७ होती. जालना जिल्ह्यातही ७८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून गतवर्षी ही संख्या ९१ होती. नांदेडमध्ये ९६ लातूरमध्ये ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

 

औरंगाबाद वगळता अन्य जिल्ह्यांत वाढले आत्महत्यांचे प्रमाण 
औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र मोठे आहे. जायकवाडीचे ९४ हजार हेक्टर सिंचन एकट्या परभणी जिल्ह्यात होते. औरंगाबादमध्येही १६ मध्यम प्रकल्प, जायकवाडी नांदूर-मधमेश्वर प्रकल्प असतानाही सिंचनाचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. जिल्ह्यात गतवर्षी १३९ तर या वर्षी १३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परभणी जिल्ह्यात गतवर्षी १२५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. या वर्षीही १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. निम्न तेरणावर भिस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १२६ शेतकऱ्यांनी गतवर्षी फास लावून घेतला. या वर्षी २३ डिसेंबरपर्यंत १३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पावसाचे प्रमाण चांगले असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या वर्षी ही संख्या ५८ वर पोहोचली आहे. 

बातम्या आणखी आहेत...