9/11 हल्ला / ओसामा बिन लादेनचा पहिला निकाह झाला तेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता, लादेनच्या पहिल्या पत्नीनेच त्याला तिसरी बायको शोधून दिली होती...

6 बायका अन् 24 मुले-मुली; असे होते सर्वात कुप्रसिद्ध दहशतवाद्याचे कुटुंब

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 03:07:13 PM IST

न्यूज डेस्क - खात्म्यानंतरही जगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्याचे कारस्थान जगजाहीर आहेत. अमेरिकेवर त्याने केलेला 9/11 च्या हल्ल्यास आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. जवळपास दोन दशकांनंतरही हल्ल्यातील पीडितांच्या जखमा भरलेल्या नाहीत. क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा होता हे क्वचितच लोकांना माहिती असेल. वयाच्या 18 व्या वर्षी पहिले लग्न करणाऱ्या ओसामाला एकूण 6 बायका होत्या. विशेष म्हणजे, त्याच्या पहिल्या पत्नीनेच तिसरी बायको शोधून आणली होती.


वडिलांना होत्या 20 बायका, 50 मुले; ओसामा 17 वा...
ओसामा बिन लादेन सौदी अरेबियाचे उद्योजक मोहम्मद बिन लादेन आणि वडिलांची 10 वी पत्नी हामिदा अल-अत्तास उर्फ आलिया खानम यांचा मुलगा होता. वडील मूळचे येमेनी आणि आई मूळची सीरियन होती. ओसामाचे वडील मोहम्मद बिन लादेन यांना 20 पत्न्या होत्या. त्यांच्यापासून तब्बल 50 मुले-मुली जन्माला आल्या होत्या. ओसामा त्यापैकी 17 व्या क्रमांकाचा मुलगा होता.


18 व्या वर्षी केला पहिला निकाह
ओसामा बिन लादेनने पहिला विवाह वयाच्या 1974 मध्ये 18 व्या वर्षी नजवा खानम हिच्याशी केला. नजवापासून ओसामाला 11 मुले-मुली आहेत असे म्हटले जाते. त्यामध्ये ओसामाचा सर्वात मोठा मुलगा अब्दुल्ला, साद, ओमर आणि मोहम्मद यांचा समावेश आहे. यापैकी ओमरने आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या ब्रिटिश महिलेशी विवाह केला. तो सध्या सौदी अरेबियात राहतो. 2001 मध्ये ती ओसामाला सोडून गेली.


दुसरे लग्न करून 7 वर्षांत घटस्फोट
ओसामाचा दुसरा निकाह 1983 मध्ये खदिजा शरीफ हिच्यासोबत झाला. खदिजापासून ओसामाला 3 मुले-मुली आहेत. लग्नाच्या 7 वर्षांनंतर 1990 मध्ये ओसामा आणि खदिजाचा तलाक झाला.


हमझा बिन लादेनची आई खारिया सबर
ओसामा बिन लादेनने खारिया सबर हिच्याशी 1985 मध्ये निकाह झाला होता. ओसामाची पहिली पत्नी नजवा हिनेच या दोघांचा विवाह लावून दिला होता असे सांगितले जाते. खारिया सबर लादेनचा सर्वात प्रिय आणि दहशतवादी संघटनेचा वारसदार हमझा बिन लादेनची आई आहे. हमझाने नुकतेच 9/11 हल्ल्यातील प्लेन हायजॅकर मोहम्मद अत्ताच्या मुलीशी अफगाणिस्तानात निकाह केला. अलकायदाचा प्रमुख ऐमन अल झवाहिरीनंतर तोच अलकायदाचा नेता आहे. सबर आणि हमझा ओसामासोबत पाकिस्तानच्या अबोटाबादला सुद्धा राहत होते.


चौथ्या पत्नीपासून 4 मुले
सिहम सबर असे लादेनच्या चौथ्या पत्नीचे नाव आहे. या दोघांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. लादेनला सिहमपासून 4 मुले आहेत. पाकिस्तानच्या अबोटाबाद येथील घरात ओसामासोबत ही सुद्धा राहत होती.


48 तासच टिकला 5 वा निकाह...
जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी राहिलेल्या ओसामाचा 5 वा निकाह फक्त 48 तासच टिकू शकला. त्या पत्नीचे नाव अजुनही समोर आलेले नाही. अमेरिकन होती असेही सांगितले जाते.


लादेनची 6 वी पत्नी
अमल अहमद अल-सदाह लादेनची सर्वात कमी वयाची पत्नी होती. येमेनमध्ये जन्मलेली अमनचा 2000 मध्ये लादेनशी निकाह झाला होता. ती येमेनमध्ये आदिवासी नेत्याची मुलगी होती. येमेनमध्ये अलकायदाचा प्रचार करण्यासाठी त्याने हा निकाह केला होता. सिहम सबर, खारिया सबरसोबत अमन सुद्धा पाकिस्तानात लादेनसोबत राहत होती. अमेरिकेने टाकलेल्या धाडीत ती जखमी झाली होती.

X
COMMENT