आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 महिन्यांत औरंगाबाद विभागातील शून्य ते पाच वर्षांच्या 915 बालकांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरे स्मार्ट करण्याच्या योजनांवर शासन आणि प्रशासनाची धावाधाव सुरू असताना डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे वास्तव सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांत औरंगाबाद विभागातील ९१५ बालकांनी विविध कारणांनी जीव गमावला आहे, असे हा अहवाल सांगतो. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालके दगावण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू असले तरी तो किती अपुरे आहेत हे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

 

बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गर्भवतींचे प्रबोधन करण्यातच शासकीय यंत्रणा मग्न असून आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याकडेही हा अहवाल लक्ष वेधतो. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित कुटुंबांचे प्रबोधन केले जाते.


गर्भवतींनी सकस आहार घ्यावा, औषधोपचार घ्यावे, वेळेवर तपासणी करून घ्यावी, बाळंतपणे रुग्णालयात व्हावीत यासाठी आशा कार्यकर्ती कार्यरत आहेत. बालकांना जन्मल्यापासून विविध लसीकरण करण्यासह आणि आजारांविषयी जनजागृती तसेच औषधोपचार दिला जातो. मात्र, अजूनही बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यात पूर्णपणे यश आलेले नाही. अनेक आरोग्य केंद्रांत डॉक्टर्स नाहीत.

 

आवश्यक साधने, यंत्रसामग्री नाही, याचा आढावाही घेतला जात नाही. विशेष म्हणजे या बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या आढाव्यांत घरोघर जाऊन कुटुंबाचे प्रबोधन करण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र, संस्थांचे सक्षमीकरण करणे, संस्थांत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे यासाठी उपाययोजना झालेली नाही.

 

असा घेतला जातो आढावा
परभणी जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूंची मीमांसा करण्यासाठी संस्थात्मक आढावा घेण्यात आला आहे. सामुदायिक आणि संस्थात्मक अशा दोन पद्धतीने आढावा घेतला जातो. प्रबोधनासाठी केलेले कार्य सामुदायिक तर उपलब्ध आरोग्य सुविधा ही बाब संस्थात्मक आढाव्यात महत्त्वाची ठरते.


विभागातील भीषण स्थिती अशी

कारणांनी होतात ५ वर्षांच्या आतील बालकांचे मृत्यू
दिवस भरण्यापूर्वीच जन्म वजन कमी भरणे कावीळची लागण असणे न्युमोनिया होणे जंतुसंसर्ग प्रसूतीप्रसंगी अपघात किंवा जखम विषबाधा अचानक मृत्यू डायरियाजन्य आजार १० श्वसनाचे आजार कुपोषण

 

आईचे दूध ही पहिली लस
बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात आईच्या दुधाची भूमिका महत्त्वाची आहे. सहा महिन्यांनंतर पूरक आहार मिळणे गरजेचे आहे. शेवटी वैयक्तिक, कुटुंब आणि परिसराची स्वच्छता यांचाही वाटा आहे. या चार पातळ्यावर काम केल्यास बालमृत्यू कमी करणे शक्य आहे. - डॉ. दत्ता कदम, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ

 

प्रमाण कमी झाले
लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. जनमानसात आरोग्य सुविधांबद्दल आलेली जागृती, प्रबळ लसीकरण मोहीम आणि तज्ज्ञांची उपलब्धता यामुळे हे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी झाले आहे. - डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

 

बातम्या आणखी आहेत...