आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू..रिमोटद्वारे दीपप्रज्वलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्‍यात आले. यंदा संमेलनात प्रथमच संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. रमाकांत कोलते यांचे भाषण झाले. यवतमाळ संमेलनाला राज्य शासनाकडून 50 लाख रुपये निधी मिळाला आहे. याआधी संमेलनाला 25 लाख मिळत होता, असे डॉ. कोलते यांनी सांगितले.

 

शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते. 

 

शुक्रवारी सकाळी येरावार चौक येथून सुरू झालेल्या ग्रंथ दिंडीने 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अनौपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेले ८ दिवस वादाचे सावट असले तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले. 


ग्रंथदिंडी मध्ये ग्रंथाच्या पालखीसह विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींची झलक पाहायल मिळाली. तसेच पोलीस बँड, शिवसमर्थ ढोल समर्थपथक अशा समुहाचे सादरीकरणही झाले. ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, स्वागताध्यक्ष ना. मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते नगराध्यक्ष कांचनताई चौधरी मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती होती.  मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.


आझाद मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बस स्थानक चौक, गार्डन रोड, एल.आय.सी. चौक, पोस्टल ग्राऊंड या मार्गाने संमेलनस्थळी पोहोचली. 

 

वैशाली येडे यांना बहुमान 
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वैशाली येडे संमेलनाचे उद्घाटन करतील. शेतकरी पतीच्या आत्महत्यानंतर हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत वैशाली सध्या सन्मानाने जगत आहेत. विशेष म्हणजे, 'तेरवं' या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्नाला तेवत ठेवले आहे.
 
बहिष्कृत कार्यक्रमांचे नियोजन पांगले, अनेक कार्यक्रम रद्दबातल 
निमंत्रित वक्ते, कवी, लेखकांनी बहिष्कार असलेल्या कार्यक्रमांचे, टॉक शोचे, मुलाखती, सत्काराचे नियोजन अखेर पांगले. आता मान्यवरांचा सत्कार, टाॅक शो, प्रकट मुलाखत होणार नाही. विद्या बाळ यांचा सत्कार, प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार नाही. 'माध्यमांची स्वायत्तता नेमकी कुणाची?' हा टाॅक शो रद्द करण्यात आला. 

 

नयनतारांना पत्र पाठवणार 
संमेलनाच्या इतिहासात प्रथमच 'प्रभारी अध्यक्ष' महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची बैठक झाली. त्या म्हणाल्या, नयनतारा सहगल यांना महामंडळाच्या वतीने एक पत्र पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्यांचे भाषण वाचले जाणार नाही. 

 

मुख्यमंत्री पक्षाच्या कामासाठी दिल्लीत : पालकमंत्री येरावार 
मुख्यमंत्री शुक्रवारी वाराणसी, तर शनिवारी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला आहेत. यामुळे ते संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र १२ किंवा १३ रोजी येण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...