आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी संपणार ‘ति’चा वनवास? ११ महिन्यांत ९३ बलात्कार, २३३ विनयभंग, ९ हुंडाबळी, २४० छळाचे गुन्हे नोंद

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बीड - हैदराबाद येथे डॉक्टर युवतीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत साळिंबा (ता. वडवणी) येथे नवविवाहितेला पेटवून देऊन खून करण्यात आला असून केज तालुक्यात औषध पाजून एका विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना आठ महिन्यांनंतर समोर आली, तर आष्टी तालुक्यातील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दोन वर्षांतील गुन्ह्यांची आकडेवारी


सन २०१९

बलात्कार    ९३

विनयभंग    २३३

हुंडाबळी    ०९

हुंड्यासाठी प्रवृत्त    १४

छळ    २४०

छेडछाड    ०४सन २०१८

बलात्कार    ८५ 

विनयभंग    २७७

हुंडाबळी    १४

हुंड्यासाठी प्रवृत्त    २१

छळ    २६१

छेडछाड    ०८वडवणी : नवविवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले 

साळिंब्यातील घटना; पती, सासू अटकेत, पाच दिवसांची पोलिस कोठडी 

नवविवाहितेचा छळ करून तिला हातपाय बांधून पेटवून देण्यात आले. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती व सासू विरोधात सुरुवातीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, पती व सासूला पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. साळिंबा (ता. वडवणी) येथील ऋतुजा भास्कर बिटे (१९) या महिलेचा गेल्या सहा महिन्यांपूर्वी भास्कर बिटेशी विवाह झाला होता. तिचे माहेर सेलू (जि. परभणी) आहे. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. सासू रुक्मिण बिटे ही ऋतुजाला नेहमी  टोचून बोलायची व तिचा छळ करायची. यातून सासूच्या सांगण्यावरून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून दिले. यात ती गंभीररीत्या भाजली होती. तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. महिलेने मृत्यूपूर्व तहसीलदार आणि पोलिसांकडे ‘आपणास सासरच्यांनी जाळले’असे जबाबात म्हटले आहे. पती भास्कर प्रल्हाद बिटे व सासू रुक्मिण प्रल्हाद बिटे या दोघांना वडवणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वडवणी पोलिसांनी वडवणी न्यायालयापुढे  हजर केले असता. न्या. एल. एम. पठाण यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक करत आहेत.चुलत दिराने केला भावजयीवर अत्याचार 
 

केज - पती रामनवमीस महादेवाच्या दिंडीमध्ये गेल्याची संधी साधून चुलत दिराने भावजयीला सोबत आणलेले औषध बळजबरीने पाजून तिला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यातील बावची शिवारात एप्रिल २०१९ मध्ये घडली होती. पीडितेने आठ महिन्यानंतर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दिराविरुद्ध युसूफवडगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी दिरास ताब्यात घेतले आहे. 
बनसारोळा शिवारातील गायरान वस्तीत राहत असलेल्या  महिलेचा पती शिखर शिंगणापूरला रामनवमीनिमित्त महादेवाच्या वारीसाठी दोन मुलासह पायी दिंडीत गेले होते. पीडिता घरी एकटीच असल्याची संधी साधून तिचा चुलत दीर बिभीषण श्यामराव काळे हा १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी आला. त्याने पीडितेच्या दोन्ही मुलीस पन्नास रुपये देऊन दुकानातून बिस्कीट आणण्यास पाठवले. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील औषध तिला जबरदस्तीने पाजून तिला दुचाकीवर बसवून बावची गायरान शिवारात नेऊन त्याने अत्याचार केला. याबाबत पीडितेने पतीस व नातेवाइकांना माहिती दिली. मात्र समाजात आपली बदनामी होईल या भीतीने पीडित महिला तक्रार देण्यास पुढे आली नव्हती, असे पीडितेने  तक्रारीत नमूद केले आहे. 

पीडित महिलेने आठ महिन्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. आरोपी चुलत दीर बिभीषण श्यामराव काळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांनी दिली. माहेरहून पैस आणण्याचा तगादा, विवाहितेचा छळ

बीड - वाहनाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये घेऊन येत तसेच घर खर्चाला ५० हजार रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्वेता सचिन लोंढे (२२, रा मुर्शदपूर, आष्टी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, वाहनाचा हप्ता भरण्यासाठी दर महिन्याला माहेरहून चार हजार रुपये घेऊन ये, शिवाय घर खर्चासाठी माहेरहून ५०  हजार रुपये घेऊन ये म्हणत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सचिन पोपट लोंढे, शोभा पोपट लोंढे जयश्री दिनकर गजघाट, दिनकर गजघाट या चौघांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.