आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळला आमदारकीच्या २६ जागांसाठी ९४ उमेदवार, आज लागणार निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच म्हणजे शनिवारी वेरूळमध्ये प्रति-विधानसभेची निवडणूक पार पडली. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत सरासरी ९० टक्के विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्राथमिक विभागातून १४ जागांसाठी ५७ उमेदवारी अर्ज तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून १२ जागांसाठी ३७ विद्यार्थ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी दाेन्ही विभागांसाठी मतदान हाेऊन ९४ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल साेमवारी लागणार आहे. 


येथील श्री संत जनार्दन स्वामी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात (गुरुकुल ) लोकशाही कशाप्रकारे चालते हे समजण्यासाठी निवडणूक आयोग स्थापन करीत प्रत्येक वर्गाच्या आमदारांची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. शाळेतील भावी आमदारांचे भवितव्य पेटीत बंद करण्यात आले तर सोमवारी या आमदारकीचा निकाल लागणार आहे.  प्रत्येक वर्गातून विध्यार्थी आमदार निवडण्यासाठी निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली हाेती.  गुरुकुलमधील प्राथमिक विभागातून १४ जागांसाठी ५७ उमेदवारी अर्ज तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून १२ जागांसाठी ३७ विद्यार्थ्यानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली तर या वेळी महिला व मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. निवडणूक लढवणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांना प्रचार सभा घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. तर दि ६ जुलै ही मतदानाची तारीख ठरवत दोन दिवस अगोदरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. ६ जुलै शनिवारी रोजी मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाली. यावेळी मतदान केंद्र निर्माण करून निवडणूक अधिकारी, केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक, पदांची नेमणूक करून मतदान केंद्राबाहेर निवडणूक आचारसंहिता नियमावली लावण्यात आली होती. मतदान करते वेळी विद्यार्थी मतदारांना आपले शाळेचे ओळखपत्र दाखवणेही बंधनकारक करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधूनच सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले होते. गुप्त मतदान प्रक्रियेमार्फत मतदान कक्षात मतपत्रिकेवरील उमेदवार व त्याचे निवडणूक चिन्हासमोर फुली मारून मतपत्रिका मतपेटीत गुप्त पद्धतीने टाकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी प्राथमिक विद्यालयातून ९०.२४ टक्के तर उच्च माध्यमिक विद्यालयातून ९१.४७ टक्के मतदान झाले. 


पाचवी-सहावीच्या वर्गांत १०० टक्के मतदान
शनिवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान पाचवी व सहावीच्या वर्गातून शंभर टक्के मतदान झाले. प्राथमिक विभागातून ३६९ मतदार विद्यार्थ्यांनी  तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून ६१६ मतदार विद्यार्थ्यांनी  मतदानाचा हक्क बजावला.  या निवडणूक प्रक्रियेचा शुभारंभ माजी आमदार हर्षवर्धन जाधव व जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रचार प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता.

 

स्ट्राँग रुममध्ये मतपेट्या  
मतदानानंतर सर्व वर्गांच्या मतपेट्या सीलबंद करून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आल्या आहेत. सोमवार दि ८ जुलै रोजी मतमोजणी होणार असून यानंतर निवडून आलेल्या आमदारांमधून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची गुरुकुल स्तरावर नियुक्ती करण्यात येणार आहे. हे मंत्रिमंडळ यंदाच्या शालेय वर्षात सर्व स्तरांवर कार्य करणार आहे.


निवडणूक प्रक्रियेत यांनी घेतला सहभाग
ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना शिक्षण विभागाचे प्रमुख पुंडलिक वाघ, गुरुकुल विकास कमिटीचे अध्यक्ष अंकुश जाधव , संस्था सचिव रामानंदजी महाराज, प्रशासन अधिकारी काकासाहेब गोरे, नानासाहेब कारभार, गोरख गावंडे यांनी भेट देऊन ही निवडणूक प्रक्रिया पाहत समाधान व्यक्त केले.  निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र देव, भगवान भोजने,  शारदा टिळेकर, गणेश कुभांडे, भरत पवार, भागीनाथ आधाने, राहुल पवार , संदीप नरोटे यांनी तर पर्यवेक्षक म्हणून सुनील कोटकर, संतोष उगले यांनी काम पाहिले. विद्यार्थी आमदार निवडीसाठी मुख्याध्यापक विजय बोरसे , पर्यवेक्षक ज्ञानेश्वर क्षीरसागर, मुख्याध्यापिका मनोरमा ताले, पर्यवेक्षक कारभारी पगार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.