आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांत विधानसभा निवडणुकांत 12,354 पैकी 9,611 उमेेदवारांची अनामत जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : निवडणुकीत भाग्य आजमावणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत अनामत रक्कमही भरावी लागते. निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये ही रक्कम दुप्पट केली. मात्र अनामत रकमेबरोबर उमेदवारांची संख्याही वाढतच चालली आहे. राज्यात गेल्या ४ निवडणुकांमध्ये थोड्याफार नव्हे तर तब्बल ७७.७% उमेदवारांवर अनामत गमावण्याची वेळ आली. अर्थात ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा होणार असल्याने सरकारची गंगाजळी वाढली, हीच काय ती समाधानाची बाब.भारतीय संविधानाच्या कलम ८४ (ब) नुसार प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. काही जण विजयासाठीच तर काही केवळ हौस, चर्चेत राहण्यासाठी निवडणूका लढवतात. यासाठी उमेदवाराला अनामत रक्कम भरावी लागते. निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, तर ही अनामत रक्कम जप्त केली जाते. यालाच उमेदवाराचे 'डिपॉझिट' जप्त होणे असे म्हणतात.

विधानसभेसाठी १० हजारांचे डिपॉझिट
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवाराला १० हजार, रुपये तर एससी-एसटी वर्गातील उमेदवारासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही रक्कम अनुक्रमे २५ हजार आणि १२,५०० रुपये असते.

असे गमावले डिपॉझिट- विधानसभा १९९९ ते २०१४
वर्ष - पुरुष - महिला - उमेदवार - डिपॉझिट - जप्त - टक्केवारी
१९९९ - १९२० - ८६ - २००६ - १२८२ - (६३.९ %)
२००४ - २५२१ - १५७ - २६७८ - २०२१ - (७५.४ %)
२००९ - ३३४८ - २११ - ३५५९ - २८८६ - (८१.०९ %)
२०१४ - ३८४२ - २७७ - ४१११ - ३४२२ - (८३.२ %)
एकूण - ११६३१ - ७३१ - १२३५४ - ९६११ - (७७.७९ %)

राज्यात उमेदवारांची वाढती संख्या
गेल्या ४ विधानसभा निवडणूकीत उमेदवारांची संख्या वाढत गेली आहे. १९९९ मध्ये २,००६ तर २०१४ मध्ये ४,१११ उमेदवारांनी निवडणूक लढवली. महिलांच्या संख्येतही वाढ होत आहे. स्पर्धक वाढल्याने एक षष्ठांश मते मिळवताना उमेदवारांची दमछाक होत आहे. यामुळेच डिपॉझिट जप्त होण्याचे प्रमाणही ६३.९ टक्क्यांवरून ७७.७९ टक्क्यांवर पोहचले आहे.

...तर रक्कम जप्त
उमेदवाराने तो लढत असलेल्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी किमान १/६ (१६.६%) मते घेतली नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते.

मोदी लाटेत ८५% अनामत रक्कम जप्त
१९५१-५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १,८७४ पैकी ७४५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९९६ च्या लोकसभेत ९१ टक्के उमेदवारांना डिपॉझिट गमवावे लागले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत ८,७४८ पैकी ७,५०२ उमेदवारांची (८५%) अनामत रक्कम जप्त झाली होती. विशेष म्हणजे मोदी लाट असतानाही ६२ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी अनामत गमावली होती. १७९ जागांवर काँग्रेस उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले होते.