आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 9th National Junior Hockey Championship : Maharashtra's Defeats In Two Matches 

9 वी राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिप : दोन पराभवांनी महाराष्ट्र संकटात; आगेकुचीसाठी दोन विजय गरजेचे! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- यजमान महाराष्ट्र युवा संघाला आपल्या घरच्या मैदानावरील ९ व्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान टीमचा सोमवारी विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पाहुण्या गंगपूर-ओडिशा टीमने सोमवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यजमान महाराष्ट्राचा पराभव केला. ओडिशा टीमने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. अमरदीप लाक्रा (३६ वा मि.) आणि ग्रेगोरी झेसने (५१ वा मि.) गोल करून आपल्या टीमचा विजय निश्चित केला. महाराष्ट्राकडून व्यंकटेश केचेने (२८ वा मि.) गोल केला. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. यामुळे महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव झाला. क गटात सगल दुसरा पराभव पत्करावा लागलेल्या महाराष्ट्र संघाला गुणांचे खाते उघडता आलेले नाही. दुसरीकडे इंडियन साई संघाने धडाकेबाज विजयाची नोंदद केली. साईने सामन्यात पंजाब सिंडिकेट बँक टीमवर २-१ ने शानदार विजय संपादन केला. तसेच हरियाणा संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंदद केली. तसेच मणिपुरने ३-१ ने मुंबई हॉकी संघाचा पराभव केला. 

 

महाराष्ट्राची झुंज अपयशी, व्यंकटेशने संघाकडून केला एकमेव गोल 
दर्जेदार खेळीची गरज :

सलामीला महाराष्ट्राला सुमार खेळीचा फटका बसला. यामुळे यजमानांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे महाराष्ट्राला आता आगामी दोन्ही सामन्यांमध्ये दर्जेदार खेळी करावी लागेल. याच्या बळावर मोठा विजय संपादन करून महाराष्ट्र आपले आव्हान कायम ठेवू शकेल. यासाठी पाच गोलच्या फरकाने विजयाची गरज आहे. त्यामुळे याची मदार कर्णधार सत्यमवर असेल. 


आता सलग दोन विजयांनी संघाचे आव्हान कायम 
यजमान महाराष्ट्राच्या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी सलग दोन मोठ्या विजयांची गरज आहे. याच विजयाच्या बळावर महाराष्ट्र युवा संघाला स्पर्धेच्या अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित करता येईल. महाराष्ट्राचा स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात उद्या दिल्ली संघाचे आव्हान असेल. दिल्लीचा संघ मजबूत मानला जातो. त्यामुळे या सामन्यात यजमानांना विजयासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. तसेच त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्राचा चौथा सामना कर्नाटकशी होणार आहे. विजय संपादन करून आव्हान कायम ठेवण्याचा महाराष्ट्र संघाचा प्रयत्न असेल. मात्र, महाराष्ट्राची वाटखडतर मानली जाते. 


हॉकीत पंजाबचे पुनरागमन, तामिळनाडू गट अमध्ये अव्वल 
पंजाब संघाने दुसऱ्या दिवशी सोमवारी सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड (एसएससीबी) ला अ गटात पराभूत केले. पंजाबने ५-१ ने सामना जिंकला. सिमरनज्योत सिंग (३,७ वा मि.), विशालजित सिंग (४९ वा मि.) रमण कुमार (५३ वा मि.) आणि अंगदबीर सिंग (६० वा मि.) यांनी गोल करून पंजाबला मोठा विजय मिळवून दिला. त्यामुळे एसएससीबीला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हॉकी तामिळनाडूने हिमाचल प्रदेशच्या विरोधातील सामन्यात २-२ ने बरोबरी साधली आणि सामना चार गुणांच्या साथीने आ गटातील अव्वल स्थान पटकावले. एस कार्थीने ४४ व्या, तर एस. मरीश्वरनने ४८ व्या मिनिटात तामिळनाडू संघासाठी गोल केले. हिमाचल संघासाठी चरणजित सिंग आणि अमितने अनुक्रमे ५७ आणि ५९ व्या मिनिटात गोल करत तामिळनाडूला विजय दुरापास्त केला.

 

हरियाणाचा दुसरा विजय 
गतवर्षी उपविजेता राहिलेल्या हॉकी हरियाणा संघाने सलग दुसरा विजय साकारला. टर्फ मैदानावर झालेल्या सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी झारखंडला पराभूत केले. या टीमने ३-२ ने सामना जिंकला. अंकुश (४, ३६ वा मि.) आणि परमितने (५२ वा मि.) यांनी गोल केले. यामुळे हरियाणाला हा सामना जिंकता आला. यामुळे हरियाणा संघाने ब गटात अव्वल स्थान कायम ठेवले. 
 

बातम्या आणखी आहेत...