आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis : विराेधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची ‘मात्रा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकऱ्यांसाठी, भारतीय जनता पक्षाच्या भवितव्यासाठी आणि सत्तेत असूनही अस्वस्थ असलेल्या शिवसेनेसाठी येता सोमवार महत्त्वाचा असेल. सव्वातीन लाख कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण कर्जमाफीची धाडसी घाेषणा करणार की एखाद्या पॅकेजवर बळीराजाची बाेळवण करणार हे साेमवारी विधिमंडळात स्पष्ट हाेणार अाहे.
पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी प्रश्नांवरील चर्चेने गाजला. या चर्चेला मुख्यमंत्री सोमवारी उत्तर देणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची मागणी केल्याने शिवसेनेलाही त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा असेल.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने विधान परिषदेचे तीन दिवसांचे कामकाज शेती प्रश्नावरून रोखले. विधानसभेतूनही तीन दिवस ते बाहेर राहिले, पण बहुमत नसल्याने कामकाज बंद पाडू शकले नाहीत. दोन्ही काँग्रेस यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचा वारसा मानतात. या दोन नेत्यांच्या संसदीय वर्तनाचा आदर्श त्यांनी दाखवला नाही. शरद पवार चाळीसहून अधिक वर्षे विधिमंडळात हाेते. मात्र, त्यांनी एकदाही आसन सोडून गोंधळ घातला नाही. कागदाचे तुकडे भिरकावले नाहीत. पवारांच्या आमदारांनी मात्र ही सगळी कृत्ये हसत केली. तोंडी शेतकऱ्यांची व्यथा असली तरी त्यांच्या देहबोलीत गांभीर्याचा अभाव होता. काँग्रेस आमदारांचीही तीच गत हाेती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखवली. त्यासाठी सभागृहात येण्याचे विराेधकांना वारंवार आवाहन केले. मात्र, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने त्याला प्रतिसाद दिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या कथित वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला. यामुळे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ला राजकारण करण्यात अधिक रस दिसला. तीन दिवसांच्या गोंधळानंतर चौथ्या दिवशी विधानसभेत पहिल्यांदाच विरोधी बाकांवर उपस्थिती दिसली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार यांनी जोरकस भूमिका मांडल्या. त्यांची भाषणे ऐकायला त्यांच्या पक्षाचेही सर्व आमदार उपस्थित नव्हते. ज्या चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार तीन दिवस सभागृहात फिरकले नाहीत, तेच आमदार स्वतःच्या नेत्यांना ऐकण्यासाठीही आले नाहीत. एवढेच काय, पण स्वतःच्या भाषणानंतर विखे-पाटील, पवार हेसुद्धा सभागृहात थांबले नाहीत.
भाषणे आटोपून सभागृहाबाहेर जाण्याची विरोधकांची घाई समजण्यासारखी होती. कारण बुधवारी संध्याकाळी काँग्रेसने आणि गुरुवारी ‘राष्ट्रवादी’ने इफ्तार पार्टी ठेवली होती.

काही अामदारांची दमदार भाषणे
शेतकऱ्यांच्याप्रश्नांवर सत्ताधारी आमदार अधिक मुद्देसूद बोलले. शिवसेनेचे गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, शंभुराजे देसाई, जयप्रकाश मुंदडा, भाजपचे अनिल गोटे, डॉ. संजय कुटे, प्रशांत बंब यांचा त्यात समावेश अाहे. बच्चू कडू यांनी टोकदार मुद्दे उपस्थित करून सरकारला अडचणीत आणले. ‘राष्ट्रवादी’च्या जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना जुन्या भाषणांची आठवण करून देत चिमटे काढले. पृथ्वीराज चव्हाणांनी ऊस उत्पादक-साखर कारखान्यांच्या समस्या मांडल्या. विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत, पण ते अजित पवारांच्या भाषणापुढे झाकोळले.

बिनकामाचे ज्येष्ठत्व
माजीमुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री, माजी कृषिमंत्री, माजी ऊर्जामंत्री, माजी जलसंपदामंत्री, माजी ग्रामविकासमंत्री, माजी महसूलमंत्री, माजी सहकारमंत्री असा सत्तेचा गाढा अनुभव असलेली फळी विरोधी बाकांवर आहे. या सदस्यांनी वस्तुस्थिती नेमकेपणाने मांडली. शेतकरी आत्महत्या रोखण्यात पूर्वी काय चुकले, नव्या सरकारने या चुका कशा टाळाव्यात, याचे मार्गदर्शन केले नाही. ‘कर्जमाफी द्या,’ या मागणीपाठी त्यांची गाडी थांबली. यापूर्वीही कर्जमाफी झाली, तरी आत्महत्या का थांबल्या नाहीत, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न विरोधातल्या ज्येष्ठांकडून झाला नाही.
बातम्या आणखी आहेत...