नवी दिल्ली- अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताच विरोधकांनी सभागृहात प्रश्नकाळात जोरदार गोंधळ घातला. महागाईसह अनेक मुद्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. यादरम्यान नुकतेच वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांनी खुलासा केला. विरोधकांचा वाढता जोर पाहून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रधम कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. परंतु, विरोधकांचा गोंधळ वाढतच असल्याचे लक्षात आल्यानंतर सदनाचे कामकाज मंगळवारपर्यंत (8 जुलै) तहकूब करण्यात आले.
दरम्यान, संसदेबाहेर महागाईच्या मुद्यावर कॉंग्रेसने जोरदार गोंधळ घातला आहे. विरोधक समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे समजते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज (सोमवार) 11 वाजता सुरुवात झाली. 14 ऑगस्टपर्यंत हे सत्र चालणार आहे. तसेच मंगळवारी रेल्वे बजेट, बुधवारी आर्थिक सर्व्हेक्षण आणि गुरुवारी अर्थसंकल्प सादर केले जाणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिली. नंतर कामाकाजाला सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. तसेच संसदेच्या बाहेरही विरोधक समर्थकांनी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात निदर्शने केली.
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले, की सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात देशातील सामान्य जनतेच्या लाभासाठी काय तरतूद केल्या आहेत, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकील पंतप्रधान मोदींसह विरोधी बाकातील नेतेही उपस्थित होते. बैठकीत रेल्वेदरवाढीवर संसदेच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाली विपक्षनेतेपदासाठी कॉॅंग्रेसने गोंधळ घालणे योग्य नसल्याचे व्यकंय्या नायडू यांनी म्हटले आहे.
या मुद्यांवर वातावरण तापण्याची शक्यता...
विरोधीपक्षनेतेपदावरून कॉंग्रेसने सरकारविरोधात दंड ठोपटले आहे. कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन शंका व्यक्त केली. मोदी सरकार आणि भाजपच्या दबावात येऊन महाजन कॉंग्रेस विरोधात निर्णय घेऊ शकतात, असा संशय कॉंग्रसला आहे. विरोधपक्षनेते पद मिळाले नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा कमलनाथ यांनी दिला आहे. विशेष म्हणजे खुशाल कोर्टात जा, असे संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळणे, सत्ता परिवर्तनानंतर महागाईत सातत्याने होणारी वाढ, अधिवेशना आधीच झालेली रेल्वेभाडेवाढ तसेच केंद्रीय मंत्री निहालचंद यांच्यावर असलेले बलात्काराचे आरोप यामुद्यांवरून विरोधकांनी मोठी सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे.
रेल्वे बजेटवर विशेष लक्ष...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी केली आहे. त्यात रेल्वेचा विस्तारासह गाड्यांचा वेग आणि क्षमता यात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा मंगळवार (8 जुलै) संसदेत आपला पहिला रेल्वे बजेट सादर करणार आहे. त्यात नरेंद्र मोदी यांच्या मनातील रेल्वेच्या विकासाबाबतच्या नवकल्पना संपूर्ण देशासमोर येणार आहे.
(फोटो: शनिवारी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीनंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासोबत भाजप नेते व्यकंय्या नायडू आणि प्रकाश जावडेकर)