आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा प्रयोग: चार दिग्दर्शक, १८ कलाकारांचा ‘बायोस्कोप’ येतोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये तीन-चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एकाच विषयावरील छोट्या चित्रपटांचे संकलन करून एक चित्रपट काढणे नवे नाही. रामगोपाल वर्मा आणि संजय गुप्ताने सहा दिग्दर्शकांना घेऊन चित्रपट तयार केले होते. हा ट्रेंड आता मराठी सिनेमातही दिसणार आहे. मराठीतील नामवंत चार दिग्दर्शक एका चित्रपटासाठी एकत्र आले असून त्यांनी चार कवितांवर आधारित कथांचे दिग्दर्शन केलेल्या चार लघुपटांचे एकत्रीकरण व १८ कलाकार असलेला "बायोस्कोप' चित्रपट पुढील महिन्यात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.

टाइमपास, बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग असे हिट चित्रपट देणारा रवी जाधव, पिपाणी, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, अनवट, अनुमती अशा उत्कृष्ट चित्रपटांचा दिग्दर्शक गजेंद्र अहिरे; गुरुपौर्णिमा, भारतीय, तुला शिकवीन चांगला धडा, बे दुणे चार चित्रपटांचा दिग्दर्शक गिरीश मोहिते आणि खेळ मांडला, गोजिरी, ती रात्र, शर्यत या चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने असे हे चार दिग्दर्शक या चित्रपटासाठी एकत्र आलेले आहेत. रवी जाधव यांनी बायोस्कोपबद्दल माहिती देताना सांगितले, चार वेगवेगळ्या कवींच्या कविता निवडून त्यांच्या चार कथांवर बायोस्कोप तयार करण्यात आला आहे. मिर्झा गालिब यांच्या गझलेवर गजेंद्र अहिरे यांनी ‘दिल-ए-नादान’, संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधव यांनी ‘मित्रा’, सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ आणि विदर्भातील प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर गिरीश मोहिते यांनी ‘बैल’ नावाचा लघुपट बनविला आहे. कविता आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक कैफियत हा समान धागा धरून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

ठाणे आर्ट गिल्डच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही कलाकार एकत्र जमलो होतो. त्या वेळी आपण एकत्रितरीत्या काहीतरी करायला हवे असे सुचले आणि एकत्रित सिनेमा काढण्याचा विचार पुढे आला. चार वेगवेगळ्या कथा एकाच सिनेमात मांडणे ही कल्पनाच अत्यंत अनोखी होती. हा अभूतपूर्व प्रयोग साकारताना एक समान धागा असावा म्हणून कवितेवर सिनेमा काढण्याचे ठरवले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर कवितेवर एकही सिनेमा झालेला नाही, असेही रवी म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...