आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 46th International Film Festival Of India Updates

46th IFFI : ‘कट्यार...'चा तिसरा शोसुद्धा ठरला हाऊसफूल, हॉलिवूड चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत… या रिपोर्टमध्ये त्यांनी हॉलिवूड चित्रपटांविषयीची माहिती दिली आहे.
"The Accused' हा चित्रपट एका निरपराध नर्सची कहाणी सांगतो. ही सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे. नेदरलँडमध्ये लिसिया बर्थ या नर्सला देवदूत अस नाव ठेवण्यात आलं. कारण तिच्यावर अनेक बालकांना जाणूनबुजून ठार केल्याचा आरोप होता. ती नर्स ज्या ज्या गंभीर आजार असलेल्या तान्ह्या मुलांच्या संपर्कात गेली किंवा हजर होती ती बालके मरण पावली. खरं तर अशी नर्स एका आजारात हजर असण्याची शक्यता कोटीमध्ये एक होती. ही आकडेवारी लक्षात घेऊन इस्पितळाच्या अधिकाऱ्याने संशोधन सुरू केले. जिडीथ या हुशार तरुणीने त्याला मदत केली. लिसियावर हा आरोप कोर्टात सिद्ध झाला. तिचे आपल्या आईशी संबंध चांगले नव्हते. तिने आपल्या मुलीला प्रियकराकडे जाण्यासाठी सोडून दिले होते. तिने पूर्वी कॉलगर्ल म्हणून काम केले होते. याप्रकारचे तिच्या भूतकाळाचे तुकडे जुळवून ती एक सीरियल किलर असल्याचे सिद्ध करणार होती. तिच्या डायरीतल्या नोंदी आणि तिचे टॅरो कार्ड सारखे छंद लक्षात घेऊन तिचे मानसशास्त्रीय प्रोफाईल बनवण्यात येते. अनेक सीरियल किलरची मानसिक स्थिती गढूळलेली असते आणि ते माणसं मारायला उद्युक्त होत असतात. अशा प्रकारचा पुरावा गोळा करून ती जवळपास ६ वर्ष तुरुंगात काढते. दरम्यान जुडीथच्याच लक्षात येते की पहिले बालक गुदमरून मेलेले नसून त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. म्हणजेच त्याला विष दिलेले नाही. हा पुरावा ती वकीलाकडे देते पण न्यायालय तो मानत नाही. तेव्हा वर्तमानपत्र तो पुरावा प्रसिद्ध करते. परिणामी, हजारो लोक तिला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर येतात. सुप्रीम कोर्ट पुन्हा सुनावणी सुरू करते आणि जुडीथने दिलेल्या नव्या पुराव्यांच्या आधारे तिची निर्दोष सुटका होते. खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट ५० वर्षाच्या दिग्दर्शिकीने बनवला होता. लिसीया आणि जुडीथ यांची कामे अप्रतिम आहेत. दोघीही आपली भूमिका जणू जगल्या होत्या.
चित्रपटात बनवण्यात फार कमी प्रमाणात महिला दिग्दर्शिका आढळतात. पण या जेव्हा काम करतात तेव्हा प्रामुख्याने महिलांनाच नायिका ठेवून काम केले जाते. ‘द इंटर्न’ सारख्या सिनेमातही ते लक्षात येते. जुन्या आणि घडलेल्या अनेक कलाकृती इथे पाहायला मिळतात. टेरेंन्स मलिक या दिग्दर्शकाचे ‘बॅड लॅण्डस’ सारखी फिल्म असेल किंवा ‘स्पेस ओडेसी’ सारखी फिल्म असेल याही इथे दाखवल्या गेल्या. ‘स्पेस ओडिसी’ हा चित्रपट सायन्स फिक्शन्स चित्रपटांच्या मालिकेतील परमोच्च बिंदू मानला जातो. पृथ्वीपासून अवकाशात निघालेल्या एका यानातील अनेकजण मरण पावतात. मग यानात उरलेल्या एकमेव नायकाचा प्रवास भूतकाळ, भविष्यकाळ वेधून वेगळ्याच युतीमध्ये प्रवेश करतो. यातील शेवटच्या दृश्यामध्ये एकाचवेळी तो म्हातारपण आणि इतर अवस्था पाहतो. मोठ्या पडद्यावर या चित्रपटातील वैज्ञानिक करामती प्रेक्षक थक्क झाले.
‘बॅड लॅण्डस’ हा देखील हॉलिवूडमध्ये उरलेल्या मोठ्या स्वतंत्र दिग्दर्शकापैकी एक टेरेन्स मलिक याचा सिनेमा होता. अशा दिग्दर्शकांना आता इंडी दिग्दर्शक म्हटले जाते. या चित्रपटात चित्रपटाचा २५ वी शीतला नायक आपल्या १७ वर्षाच्या मैत्रीणीसोबत अमेरिकेत लपूनछपून प्रवास करतो. एखाद्या परीकथेतल्या राजपुत्राप्रमाणे तो स्वत:ला मानत असतो. ती १७ वर्षाची नायिका आपल्याला निवेदन करते. हे सारे खून होताना दोघांनाही कुठल्याही प्रकारे पश्चातापाची भावना नसते. अगदी शेवटपर्यंत नायक एखाद्या स्वप्नात वावरल्यासारखा वावरतो. शेवटच्या क्षणीही तो डोक्यावर हॅट घालून रुबाबात पोलिसांना शरण येतो. तो केवळ एकदाच अस्वस्थ होतो ते म्हणजे पोलिस जेव्हा त्याची हॅट खेचून घेतात तेव्हा. आज अमेरिकेत शाळेत घुसून गोळीबार करणारा किंवा सुसाइड बॉम्बर अतिरेकी संघटनांमध्ये दाखल होणाऱ्या अनेक नव्या प्रतिनिधींचे प्रतिबिंब त्यात दिसते. निसर्ग हा मलिकच्या अनेक चित्रपटांचा विलक्षण गाभा आहे. ज्या लपायच्या जागा तो शोधतो त्या लॉगशॉटमधील चित्रण, मेक्सिकोमधील वाळवंट, त्यातील शेवटचा थरारक पाठलाग, निरभ्र आकाश आणि त्याला पकडून नेणाऱ्या विमानातून दिसणारे ढगांचे थर हे सारे एका मोठ्या पडद्यावर पाहताना पुन्हापुन्हा ते लोक ज्यामध्ये सिनेमाचा आस्वाद एकाच थेटरमध्ये शेकडो प्रेक्षकांसोबत एकाग्र होऊन घ्यायचा असतो.
भोवताली कार्यक्रमांची गर्दी चालू आहेच. मात्र फेस्टीव्हलचा उत्तरार्ध सुरु झाल्यामुळे अनेक प्रेक्षक घरी निघून गेलेले आहेत. परवा झालेल्या प्रियदर्शनच्या मुलाखतीत आपण इतर पुस्तकांच्या वाचनाचा छंद लागल्यामुळे आपण सिनेमाकडे वळलो असे त्याने सांगितले. प्रसिद्ध पत्रकार मयांक शेखर याने त्याची मुलाखत घेतली. सुरुवातीला प्रियदर्शनने त्याला कोपरखळी मारली. तो म्हणाला, ‘मयांक शेखरने माझ्या अनेक चित्रपटांवर टीका केलेली आहे. ते वाईट आहेत असे त्याने म्हटलेले आहे.’ त्यावर मयांक म्हणाला, ‘पण अनेक चित्रपटांचे कौतुकही केलेले आहे.’
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘कट्यार काळजात घुसली’ हा तिसऱ्यांदा दाखवण्यात आला. आणि चक्क तिसऱ्यांदाही हाऊसफुल्ल झाला. पहिल्यांदाच इथे सर्वाधिक मराठी चित्रपट आहेत आणि ते कौतुकाचा विषय ठरलेले आहेत. मराठी सारख्या चित्रपटात तृतीयपंथाचे काम करणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या कामांचे भरपूर कौतुक झाले. औरंगाबादला नाट्य अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कुलकर्णी यांनी गेली काही वर्ष स्वतंत्र कारकीर्द सुरू केली. या चित्रपटाने आपल्याला वेगळी दृष्टी दिली आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान मकरंद अनासपुरे पासून सयाजी शिंदेपर्यंत अनेक अभिनेते, मराठी दिग्दर्शक महोत्सवात हजेरी लावत आहेत.