आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखांच्या जागेवर अक्षय कुमार जाणार राज्यसभेवर? या कलाकारांच्याही नावाची चर्चा सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून नेमण्यात येणाऱ्या 12 पैकी तीन सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध उद्योजिका अनु आगा आणि अभिनेत्री रेखा ही या तीन सदस्यांची नावे आहेत. आता या तीन जागांवर कुणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रेखा यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर बॉलिवूडमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. या जागेसाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नाव आघाडीवर आहे.

 

अक्षयशिवाय या नावांचीही चर्चा सुरु...

अभिनेत्री जुही चावला, गजेंद्र चौहान, अनुपम खेर, सलीम खान, सुरेश ओबेरॉय, विवेक ओबेरॉय आणि ऋषी कपूर यांचीही नावे राज्यसभेच्या या एका जागेसाठी चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय  जॅकी श्रॉफ, वहिदा रहमान, आशा पारेख आणि मधूर भांडारकर यांचीही नावे चर्चेत असल्याचे वृत्त आहे.

 

अक्षय कुमारचे नाव आघाडीवर असण्यामागचे कारण...   

शहिदांसाठी निधी उभारण्याचं काम असो, सॅनिटरी नॅपकीनबाबतची जागृती मोहीम असो, वा पंतप्रधानांनी आयोजित केलेलं स्वच्छता अभियान असो प्रत्येक कार्यात अक्षय कुमार आघाडीवर होता. त्यामुळे त्याची या जागेसाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

 

गजेंद्र चौहानही स्पर्धत...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले अभिनेते गजेंद्र चौहानही या स्पर्धेतील महत्वाचे दावेदार असल्याचे मानले जात आहे. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने चौहान यांना भाजपकडून राज्यसभेची बक्षिसी दिली जाऊ शकते, असा कयास आहे.  

 

रेखा यांची सभागृहात होती अतिशय कमी उपस्थिती...

सभागृहात सर्वांत कमी उपस्थिती असल्याचा विक्रम रेखा यांच्या नावी आहे. त्या अवघ्या साडेचार टक्केच सभागृहात उपस्थित होत्या. त्यामुळे मोठ्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागले होते.

 

असा होता रेखा यांचा राज्यसभेतील पहिला दिवस...

16 मे 2012 रोजी रेखा पहिल्यांदा खासदार म्हणून राज्यसभेत दाखल झाल्या होत्या. खासदारकीच्या पहिल्या दिवशी त्यांनी 19 मिनिटे राज्यसभेत घालविली होती. त्यादिवशी संसदेत दिवसभर रेखा यांच्याच नावाची चर्चा होती. 10 ऑक्‍टोबर 1954 रोजी जन्मलेल्या रेखा यांचे नाव राज्यसभा सचिवालयाच्या नोंदीनुसार 'कुमारी रेखा' असे पुकारण्यात आले होते. सोनेरी साडीचा अंगभर पदर घेतलेल्या रेखा यांनी ईश्‍वराला स्मरून सराईतपणे इंग्रजीतून शपथग्रहण केले होते. त्यानंतर साऱ्यांनीच त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. 19 मिनिटे थांबून रेखा राज्यसभेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी थेट गुरुद्वारा रकाबगंजमध्ये जाऊन माथा टेकविला होता.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, राज्यसभेतील रेखा यांची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...