आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटेनाटे आरोप झाले तेव्हा फक्त बाळासाहेब पाठीशी; अमिताभ यांनी जागवल्या अाठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी पित्यासमान होते. माझ्यावर व बच्चन परिवारावर जेव्हा जेव्हा खोटेनाटे आरोप झाले तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले,’ अशा अाठवणी महानायक अमिताभ बच्चन यांनी जागवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या चित्रपटाचा टिझर गुरुवारी प्रदर्शित करण्यात अाला त्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

 
बच्चन म्हणाले की, १९८३ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला जो भीषण अपघात झाला होता तेव्हा अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या मला बंगळुरूवरून मुंबईत अाणले. त्या वेळी विमानतळावरून शिवसेनेच्या अॅम्ब्युलन्समधूनच मला ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत, ज्या वेळी बाळासाहेबांनी मला मार्गदर्शन केले आहे. त्यांचा हा जीवनपट केवळ तीन तासांपुरता मर्यादित ठेवू नका. त्याच्या प्रत्येकी तीन तासांच्या १० ते १२ सीडीज होतील इतके या जीवनपटाचे भाग तयार करा. बाळासाहेब ठाकरे यांचे समग्र जीवन पुढील पिढ्यांना कळण्यासाठी हे सारे करणे आवश्यक आहे.’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुखांवर चित्रपट काढणे हे शिवधनुष्य आहे. याही आधी काही जण शिवसेनाप्रमुखांवर चित्रपट काढण्याची कल्पना घेऊन माझ्याकडे आले होते. पण त्यांना ते जमणे शक्य नव्हते. शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यावर एक मराठी नाटक काढण्याचाही प्रयत्न झाला. कणा पिचलेल्या लोकांना ज्यांनी ताठ मानेने जगायला शिकवले त्या शिवसेनाप्रमुख या महानायकावर निघणारा ‘ठाकरे’ हा चित्रपट खूप उत्तम व प्रेरणादायी होईल,’ अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. ‘ठाकरे’ हा चित्रपट हिंदी व मराठी भाषेत बनवण्यात येणार असून त्यानंतर तो इंग्लिश व जगातील विविध भाषांमध्येही डब करण्यात येणार आहे.


बाळासाहेबांच्या जीवनकथेतून मिळेल बळ : नवाजुद्दीन  
‘ठाकरे’ या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका करत असलेला नवाजुद्दीन सिद्दिकी दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माॅरीशसला गेला असल्याने या समारंभाला उपस्थित राहू शकला नाही. त्याने व्हिडिअाे  संदेशात म्हटले, ‘बाळासाहेब ठाकरेंची भूमिका माझ्यासारखा अमराठी माणूस कशी निभावेल अशी शंका अनेकांना असेल, पण मला या भूमिकेसाठी बाळासाहेबांच्या जीवनकथेतूनच बळ मिळेल याची खात्री आहे. मी या भूमिकेला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न करेन.’ 

 

- बाळासाहेब ठाकरे यांच्यावर याआधी मराठीमध्ये 'बाळकडू' हा सिनेमा आला होता. त्याची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. 


- हिंदीमध्ये निर्मिती होणाऱ्या चित्रपटाचे लेखन संजय राऊत यांचे असणार आहे. हा चित्रपट भव्य-दिव्य करण्याची राऊत यांची इच्छा असल्याचे म्हटले जाते. 
- हिंदीमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील दिग्गजांची टीम काम करणार असल्याची माहिती आहे. 
- या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करणार असल्याची माहिती आहे. 

 

आधी होती अशी चर्चा... 
- बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट असल्याने त्यांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांनाच उत्सूकता होती. 
- आधी अशी माहिती होती की अजय देवगण बाळासाहेबांच्या भूमिकेत असेल, मात्र बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीनचे फोटो समोर आल्यानंतर तोच या भूमिकेत असणार हे नक्की झाले आहे. 
- सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी चित्रपटाची घोषणा होईल तेव्हा नवाजुद्दीनही उपस्थित राहाणार आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाळासाहेबांच्या भूमिकेत कसा दिसतो नवाजुद्दीन... 

शेवटच्या स्लाइडवर टिझर... 

बातम्या आणखी आहेत...