आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारांसाठी लंडनला पोहोचला इरफान खान, फोटो शेअर करुन लिहिला इमोशनल मेसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या आजाराने ग्रस्त असून तो लंडन येथे या आजाराच्या उपचारासाठी गेला आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला या आजाराचे निदान झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता इरफानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

स्वत:च्या सावलीचा एक फोटो पोस्ट करत इरफानने यात कॅप्शन म्हणून रेनर मारिया रिल्का यांची एक कविता लिहिली आहे. अतिशय गर्भितार्थ दडलेली ही कविता वाचता आयुष्याकडे इरफान सकारात्मक दृष्टीनेच पाहत असल्याचं स्पष्ट होतंय. इरफानने लिहिले, "God speaks to each of us as he makes us, then walks with us silently out of the night. These are the words we dimly hear: You, sent out beyond your recall, go to the limits of your longing. Embody me. Flare up like a flame and make big shadows I can move in. Let everything happen to you: beauty and terror. Just keep going. No feeling is final. Don’t let yourself lose me. Nearby is the country they call life. You will know it by its seriousness." काही दिवसांपूर्वी इरफानने त्याच्या आजारपणाची माहिती चाहत्यांना दिली होती. 


इरफानने ट्वीटरवर काय लिहिले होते?

इरफानने त्याच्या ट्वीटची सुरुवात लेखिका मार्गेट मिशेल यांच्या एका कोटने केली होती. त्याने लिहिले होते, 'आपण अपेक्षा करतो, ते देणं आयुष्यासाठी बंधनकारक नाही.' इरफानने त्याच्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले होते, "अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणं हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा." 


काय असतो न्यूरो एन्डोक्राइन ट्यूमर?
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनाही हाच आजार होता. 2003 मध्ये त्यांच्या पँक्रियाजमध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झाले होते. 8 वर्षे या आजाराशी लढा दिल्यानंतर 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. 51 वर्षीय इरफानने 5 मार्च रोजी ट्विट करत एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्या आजारावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा एक दुर्मिळ आजार असून तो एंडोक्राइन हार्मोन बनवणाऱ्या पेशींत होतो. याचा ट्यूमर हा फुफ्पुस, अपेंडिक्स, आतड्या किंवा शरीरातील कोणत्याही भागात तयार होतो व कर्करोगातही परावर्तित होऊ शकतो. एम्सच्या सर्जरी विभागाचे सहायक प्राध्यापक सुनील कुमार यांच्या मते, रेडिएशन, शस्त्रक्रिया आणि किमोथेरेपीद्वारे यावर उपचार शक्य आहे. डॉक्टरांनुसार या ट्यूमरचे पहिले व दुसरे स्तर सामान्य असते. तिसरे स्तर घातक असते. यात हा ट्यूमर कर्करोगाचे रूप घेतो.


कोण आहे इरफान खान?
- 7 जानेवारी 1967 रोजी जयपूर येथे जन्मलेल्या इरफानने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याला प्रयोगशील भूमिकांसाठी ओळखले जाते.
- 1988 मध्ये मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' या चित्रपटातून इरफानने डेब्यू केले होते. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते.
-  हासिल, मकबूल, लाइफ इन मेट्रो, न्यूयॉर्क, द नेमसेक, लाइफ ऑफ पई, साहब, बीवी और गँगस्टर 2 आणि पान सिंह तोमर हे इरफानचे गाजलेले चित्रपट आहेत.
- 2011 मध्ये इरफानने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2012 मध्ये इरफानला पान सिंह तोमरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  


पुढील स्लाईड्सवर वाचा, इरफानचे मेसेज..  

बातम्या आणखी आहेत...