आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'पद्मावत' या चित्रपटानंतर आता अभिनेत्री कंगना रनोट हिचा नवा चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’ हा कडव्या विचारसरणीच्या संघटनांचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्यापासून प्रेरित असला तरी तो त्यांचा चरित्रपट नाही, असे निर्मात्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, तरीदेखील सर्व ब्राह्मण महासभेने इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप घेत या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळ 'मणिकर्णिका'साठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
ही कल्पनाही सहन न होणारी, कंगनाचे स्पष्टीकरण...
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना रनोटने राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध होते, ही कल्पनाही सहन होणारी नाही, असे म्हटले आहे. चित्रपटात आक्षेपार्ह काहीही नसल्याचा तिने खुलासा केला आहे. लक्ष्मीबाईंचा जन्म भारतात झाला, याचा आपल्याला गर्व आहे. तरुण वयात इंग्रजांशी लढताना लक्ष्मीबाईंनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्याविषयी असा विचार करणे अतिशय खालच्या पातळीचे आहे, असे ती म्हणाली. कंगना या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुरुवारी जोधपूर येथे दाखल झाली आहे. तिने विमानतळावर दैनिक भास्करसोबत बातचित केली.
या चित्रपटात काम करण्याचे समाधान....
- कंगना म्हणाली- "देशाच्या ज्या मुलीने स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तिचे नाव प्रत्येक भारतीय गर्वाने घेतो. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. चित्रपटाविषयी चुकीचा विचार करणे घृणास्पद आहे. आम्ही असा कधीही विचार करु शकत नाहीत."
- ‘मणिकर्णिका’वरुन निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने पहिल्यांदाच तिची बाजू स्पष्ट केली.
वाद निर्माण करुन प्रसिद्धी मिळवू इच्छितात लोक...
- कंगना म्हणाली, - "काही लोक वाद निर्माण करुन प्रसिद्धी मिळवू इच्छित आहेत. जे लोक चित्रपटात झाशीच्या राणीचे प्रेमप्रसंग असल्याचे सांगत आहेत, त्यांनी सर्वप्रथम चित्रपट बघावा, चित्रपटात आक्षेपार्ह काहीच नाही."
दिग्दर्शकाने स्वतःच्या मुलीचे नाव ठेवले मणिकर्णिका
- कंगनाने सांगितले, की जे लोक अशाप्रकारचा वाद निर्माण करत आहेत, त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक अतिशय दुखावले गेले आहेत. ‘बाहुबली’च्या लेखकांनी या चित्रपटाती पटकथा लिहिली आहे. दिग्दर्शक या व्यक्तिरेखेने एवढे प्रभावित झाले, की त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव मणिकर्णिका ठेवले.
काय आहे चित्रपटात?
- हा चित्रपट इंग्रज आणि झाशीच्या राणीत झालेल्या युद्धावर आधारित आहे. चित्रपटात कंगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अतुल कुलकर्णी तात्या टोपे, सोनू सूद सदाशिव आणि अंकिता लोखंडे झलकारी बाईच्या भूमिकेत झळकणार आहे.
- ‘मणिकर्णिका’चे शूटिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मध्ये जयपूर आणि जोधपूर येथे झाले होते. 23 नोव्हेंबर रोजी मेहरानगड फोर्टवर शूटिंगदरम्यान कंगना जखमी झाली होती. आता चित्रपटाचे फायनल शेड्युल बीकानेर येथे होणार आहे. चित्रपट यावर्षी 3 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
हा आहे वाद..
- या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रजी अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुळात हा चित्रपट एका परदेशी लेखकाच्या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा मलिन होत आहे. याप्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी योग्य ते स्पष्टीकरण द्यावे, असा इशारा ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी दिला.
- हा चित्रपट लेखिका जयश्री मिश्रा यांच्या ‘रानी’ पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी रॉबर्ट एलिस आणि राणी लक्ष्मीबाई यांचे प्रेमसंबंध असल्याचा उल्लेख आहे. 2008 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी या पुस्तकावर बंदी घातली होती. मात्र, सध्या हे पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- यापूर्वी ब्राह्मण महासभेने ‘पद्मावत’वरुन राजपूत संघटनांना पाठिंबा दिला होता. आता ‘मणिकर्णिका’वरुन राजपूत संघटनांनी ब्राह्मण महासभेला पाठिंबा दर्शवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.