आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: \'प्रेमा तुझा रंग कसा\'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू, सुरु झाला शो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असतं, प्रेमाची भावना गुलाबी असते, असं दाखवण्यात आलं. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू स्टार प्रवाह आपल्यासमोर मांडत आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु झाली आहे. 16 जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका सुरु झाली. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 

 

स्टार प्रवाहनं नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे प्रेमा तुझा रंग कसा ही नवी मालिका... सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर गुन्ह्यांच्या तपासावर आधारित अनेक कार्यक्रम झाले असले, तरी केवळ प्रेमाशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित मालिका करण्याचा पहिला प्रयत्न स्टार प्रवाह करत आहे. त्यामुळेच या मालिकेचं वेगळं महत्त्व आहे.

 

या नव्या शोविषयी सांगताना स्टार प्रवाहच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या ‘लक्ष्य आणि पंचनामा या कार्यक्रमांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांसोबत स्टार प्रवाहचं एक वेगळं नातं बनलं आहे या नात्याचा मान ठेऊन पुढची पायरी गाठण्याचा आमचा मानस आहे. प्रेमा तुझा रंग कसा हा कार्यक्रम ही पायरी गाठेल याची आम्हाला खात्री आहे.’

गश्मीर महाजनीनं अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. उत्तम शरीरयष्टी, रफ अँड टफ लूक्स आणि धीरगंभीर आवाज ही गश्मीरची खासियत... गश्मीर या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या मालिकेचं सूत्रसंचालन करणार आहे. त्याच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. गश्मीर महाजनीच्या मते ‘एक संवेदशनशील व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत आपलं मत मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बऱ्या-वाईट घटनांबद्दल मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रपरिवाराशी नेहमी संवाद साधतो. प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रेक्षकांशीही मला मनमोकळा संवाद साधायला मिळणार आहे.’  

 

बातम्या आणखी आहेत...