आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसन्न, प्रफुल्लित ‘शशि’मय गाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशी कपूर खरा प्रकाशझोतात आला तो ‘जब जब फूल खिले’मुळे. त्यातील त्याची व नंदाची केमिस्ट्री आजही भावते. यातील अवीट गोडीच्या गाण्यांवर कानसेन फिदा. ‘परदेसीयोें से ना आखियाँ मिलाना’मधला त्याचा वावर सर्वांनाच आवडणारा...

 

तो सुपरस्टार नव्हता. मात्र, अनेक सुपरस्टारबरोबर तोडीस तोड काम करायचा. कपूर घराण्याचा वारसा. त्यातून चार्मिंग इमेज. हिंदी चित्रपट जगताच्या संगीताच्या सुवर्णयुगाचा उतरता काळ त्याच्या वाट्याला आला. त्यातच त्याचा भाऊ शम्मीने आगळ्या नृत्य अदाकारीने सर्वांची मने काबीज केलेली, तर दुसरा भाऊ शोमन. मात्र, या दोघांहून वेगळी शैली जोपासत पडद्यावर शशी कपूरच्या वाट्याला जी गाणी आली त्यांचे त्याने सोने केले. गाण्यातल्या त्याच्या उत्साहाने ती गाणी प्रफुल्लित, प्रसन्न, सदाबहार झाली. मग ते खिलते है गुल यहाँ असो की वादा करो नही, ‘घुँगरू की तरह’मधला विरह त्याने नेमका रसिकांपर्यंत पोहोचवला.  

 

शशी कपूरची अनेक गाणी गाजली.   त्याच्या ‘चोर मचाए शोर’मधल्या ले जाएंगे ले जाएंगे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या गाण्याशिवाय आजही एकही विवाह साजरा होत नाही. शशी कपूर खरा प्रकाशझोतात आला तो ‘जब जब फूल खिले’मुळे. त्यातील त्याची व नंदाची केमिस्ट्री आजही भावते. यातील अवीट गोडीच्या गाण्यांवर कानसेन फिदा. ‘परदेसीयोें से ना आखियाँ मिलाना’मधला त्याचा वावर सर्वांनाच आवडणारा. ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’मधली त्याची निरागस कबुली भावणारी, ‘एक था गुल और एक ती बुलबुल’मध्ये रफीच्या आवाजाला साजेशी अदाकारी नेमकी लक्षात राहणारी. ‘यहाँ मै अजनबी हूँ’ आणि ‘ये समां समां है प्यार का’ ही गाणी त्याचे अस्तित्व लक्षात आणून देणारी. फकीरा चल चला चल, एक रास्ता है जिंदगी (काला पत्थर), है यारी सुन यारी तेरी (सुहाग) ही गाणी आजही लागली की मोटारसायकलवर जाणारा शशी आठवतो. आर. डी. बर्मनच्या संगीत साजाने सजलेले तून बिन जाऊँ कहाँ (प्यार का मोसम) मधला तो  मेंडोलीनचा  पीस वाजवतानाचा शशी स्मृतिआड जाणे अशक्य. त्यातलेच ‘नी सुलताना रे’, ‘प्यार का मोसम आया’ यांचा गोडवा काही औरच. शर्मिला टागोरबरोबर त्याची चांगली जोडी जमली. या दोघांनी जवळपास १४ चित्रपटांत काम केले. ‘आ गले लग जा’मधले त्यांचे ‘वादा करो नही’ आणि ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ ही गाणी या काळातही एफएमवर धूम करताहेत. ‘दीवार’मधले ‘कह दो तुम्हे या चूप रहूँ’मधली त्याची नीतूसिंगबरोबरची धमाल चांगलीच रंगली. 

 

रफीच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक ‘चले थे साथ मिल के’ हे शशीच्या ‘हसीना मान जाएगी’मधले गाणे विसरून कसे चालेल? यातलेच ‘बेखुदी मे सनम उठ गए ये कदम’ हे ठेकेदार युगल गीत तर सदाबहार. ‘कन्यादान’मधले ‘लिखे जो खत तुझे’ हे शशीच्या वाट्याला आलेले रफीचे आणखी एक अविस्मरणीय गाणे. ‘शर्मिली’मधली सर्वच गाणी गाजली. यातील ‘खिलते है गुल यहाँ’ खासच.  ‘नमक हलाल’मधले ‘रात बाकी...’ लक्षात राहते ते शशीच्या या गाण्यातील संवादामुळेच. ‘सत्यम शिवम सुंदरम’मधले मुकेशच्या आवाजातले चंचल कोमल शीतल गाणे हे शशीच्या स्मृती दीर्घकाळ स्मरणात ठेवणारे.   

 

बातम्या आणखी आहेत...