आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग वेगळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशी कपूरने पिता पृथ्वीराज कपूर यांच्याकडून रंगभूमीवरच्या प्रेमाबरोबर त्याला अस्सल सौंदर्याचा वारसा मिळाला. पण चेहऱ्याच्या बळावर स्टार म्हणून बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा त्याला काही तरी वेगळे करण्यात रस होता...

 

शशी कपूरची सुरुवातीची कारकीर्द कोणत्याही नव्या नटाइतकीच संघर्षपूर्ण होती. ‘आर. के. फिल्म्स’च्या चित्रपटातून तो वाजतगाजत पडद्यावर आला नाही. मात्र, त्याचा पहिला चित्रपट ‘चार दीवारी’ मिनी क्लासिकच्या दर्जाचा होता. कृष्णा चोप्रा यांनी त्याला पडद्यावर अाणले. नंदा त्याची नायिका होती. एका तरुण जोडप्याला ‘अरे संसार संसार’ हे सत्य कसे समजते, याची ती हृदयस्पर्शी गोष्ट होती.  योगायोगाने शशी कपूरला दुसरी संधी दिली ती बी.अार. चोप्रांनी.  ‘धर्मपुत्र’ हा आचार्य चतुरसेन शास्त्री या दिग्गज साहित्यिकाच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित त्यांचा चित्रपट होता.

 

इथेही शशी नवविवाहित तरुण होता. त्याची नायिका होती माला सिन्हा. या कथेत नायक समाजसुधारणेचा आव न आणता सामाजिक न्यायासाठी झटतो.  एकीकडे इस्माईल मर्चंट यांच्या ‘दी हाउसहोल्डर’ या इंग्रजी चित्रपटामधून शशी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये झळकला. हे साहचर्य पुढे दोन दशके टिकले. शेवटच्या ‘मुहाफिज’पर्यंत. ‘प्रीटी पॉली’ याही चित्रपटात तो हेले मिल्स या त्या वेळच्या हॉलीवूडच्या ‘टॉप’च्या नायिकेबरोबर दिसला. पण या चित्रपटांचा शशीला बॉलीवूडमध्ये स्थैर्य मिळायला उपयोग झाला नाही.   


‘जब जब’नंतर शशी ‘चालू’ लागला. ‘हसीना मान जाएगी’, ‘आमने सामने’ (शर्मिला टागोर), ‘अभिनेत्री’, ‘प्यार का मोसम’ या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये स्टार म्हणून शशी कपूरची भरभराट झाली. त्याची जोडी गाजली, ती मात्र एका नायकाबरोबर! अर्थात, अमिताभ बच्चनसाेबत ‘दीवार’मध्ये.  ‘मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है; तुम्हारे पास क्या है’ या अमिताभच्या नाट्यपूर्ण सवालाची हवा ‘मेरे पास मां है’ या एका वाक्याने काढून घेणाऱ्या शशी कपूरला प्रेक्षकांनी कडाडून दाद दिली. नंतर ‘काला पत्थर’, ‘सुहाग’, ‘दो और दो पांच’, ‘नमकहलाल’, ‘सिलसिला’ वगैरे अंदाजे डझनभर चित्रपटांमध्ये ही जोडी दिसली. पण ‘दीवार’ची जादू त्यांच्यात नव्हती.  अमिताभच्या अॅक्शन हीरोला देखणा, सफाईदार (आणि काहीसा श्रीमंत) विरोध आणि प्रेक्षकांना ‘व्हरायटी’ पुरवणे, हेच त्या चित्रपटांमध्ये शशी कपूरचे काम होते.   या धंदेवाईक चित्रपटांमधून वाट काढत ‘न्यू देहली टाइम्स’सारख्या वेगळ्या (आणि चांगल्या) चित्रपटामध्ये शशी दिसला. त्यातला पत्रकार नायक त्याने मन:पूर्वक रंगवला आणि आश्चर्य म्हणजे, तसे असूनही त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला.

 

दरम्यान, राज कपूरकडे त्याला ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ (झीनत अमान हिच्याबरोबर) करायला मिळाला. नट म्हणून त्या चित्रपटाने शशी कपूरला काही दिले नाही. शेवटी स्वत:मधल्या कलाकाराला संतुष्ट करण्यासाठी शशी कपूरला निर्माता बनावे लागले. श्याम बेनेगल (‘जुनून’, ‘कलियुग’), गोविंद निहलानी (‘विजेता’), गिरीश कर्नाड (‘उत्सव’) यांच्याशी हातमिळवणी करून त्याने वेगळे चित्रपट दिले. मात्र,  त्याला जबर आर्थिक फटका बसला. मग त्याने दिग्दर्शक बनून पाहिले. अमिताभ आणि ऋषी कपूर यांना घेऊन ‘अजुबा’ काढला. इथेही नशिबाने त्याला साथ दिली नाही.  आणि शेवटी त्या फुटकळपणाला कंटाळून एक दिवस त्याने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला! 

बातम्या आणखी आहेत...